News Flash

महिला दिन विशेष : खो खोचे मैदान ते पुण्यात सहायक पोलीस निरीक्षक; सुजाता शानमेंचा प्रेरणादायी प्रवास

त्यांना खो खोमधील कामगिरीसाठी राज्य सरकारने शिवछत्रपती क्रिडा पुरस्काराही दिलाय

उस्मानाबाद येथील एका गावातील सर्व सामान्य कुटुंबात सुजाता शानमे यांचा जन्म झाला. त्यांना लहानपणापासून खो खो खेळाची प्रचंड आवड होती. त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्य सरकार मार्फत शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले. मात्र त्याच दरम्यान सुजाता यांची आई त्यांना, मुली स्पर्धा परीक्षा देऊन पीएसआय हो, अशी इच्छा व्यक्त केली होती. आईची तीच इच्छा पूर्ण करत स्पर्धा परीक्षेत चांगले गुण मिळवून सुजाता पीएसआय झाल्या आहेत. आज त्या पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात सहायक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. आईला दिलेला शब्द पूर्ण केल्याचा सांगताना सुजाता यांचा कंठ दाटून येतो. तर आज महिला दिनानिमित्त सुजाता शानमे यांचा संघर्षमय प्रवास जाणून घेणार आहोत.

सुजाता शानमे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी खो खोमध्ये आपण एका शर्यतीमुळे आल्याचं सांगितलं. “माझे बाबा जिल्हा परिषदेत कामाला होते आणि तर आई गृहिणी होती. त्यामुळे माझं बालपण इतर मुलीप्रमाणे गेले. मी शाळेत हुशार होते. पण इयत्ता सहावीमध्ये गेल्यावर मला खेळाची आवड लागली. काही तरी वेगळं काहीतरी करावं असं मला सतत वाटत होते. त्याचदरम्यान आमचे पीटीचे सोनवणे सर यांनी शाळेत धावण्याची स्पर्धा घेतली. साधारण २०० मीटर धावण्याची ही स्पर्धा होती. आपण या स्पर्धेत पाहिले यायचे असा स्टार्टींग लाइनवर विचार करीत असतानाच सरांनी शिट्टी वाजवली, तसे आम्ही सर्वजण धावत सुटलो. तेवढ्यात कोणाचा तरी मला धक्का लागला आणि मी खाली पडले. त्यामुळे मला खूप वाईट वाटले. माझ्याकडे तेव्हा कोणीही लक्ष दिले नाही. पुन्हा उठून धावण्यास सुरुवात केली आणि समोर असलेल्या भिंतीला स्पर्श केला. पुन्हा त्याच ठिकाणी आले, तर माझा पहिला नंबर आला. तिथेच सरांनी मला उद्यापासून खो खोच्या सरावासाठी यायचं आहे असं सांगितलं. हा सराव शाळा सुटल्यानंतर तासभर असणार होता. याबद्दल घरामध्ये केवळ बहिणीला माहिती होते. कारण घरी शिक्षणाबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यास तयार नव्हते. पण अखेर एकेदिवशी मी खो खो खेळत असल्याचे आई आणि बाबांना समजले. तेव्हा एक सांगण्यात आले की, तू खेळण्याच्या नादात अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नकोस. अन्यथा तुझा सराव बंद केला जाईल. असा धमकी वजा इशाराच देण्यात आला,” असं सुजाता यांनी सांगितलं.

सुजाता यांनी घरच्यांना दिलेला शब्द पाळायचा असल्याने आणखी जोमाने तयारी करण्यास सुरुवात केली. “मी माझा अभ्यास आणि सरावही एकाच वेळी करीत राहिले. तालुका, जिल्हा, राष्ट्रीय स्पर्धात खेळत राहीले आणि यश मिळत गेले. गावापासून राष्ट्रीय स्तरावर जाण्याचा प्रवास घरातील प्रत्येकाने वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळे शक्य झाले. पण आता माझा हा प्रवास इथेच थांबला नाही. मी एमएबीएडचा अभ्यास करताना. स्पर्धा परीक्षा देण्याचं ठरविले आणि काही माहिती नसताना अभ्यासाला सुरुवात केली. मला अधिकारी व्हायचे आहे. कॉलेजमध्ये असताना महिला पोलिस अधिकारी कर्मचारी येत होते. त्यांना पाहून आपण देखील असे अधिकारी व्हायचे असा मनाशी निश्चय केलं होता. त्याच दरम्यान आईने मला पोरी तू पीएसआय हो, असं सांगितलं. आईचे शब्द अभ्यास करताना कायम आठवत राहीले. माझा एमएबीएड आणि स्पर्धा परीक्षा दोन्हींचा अभ्यास सुरू होता. त्या दोन्ही परीक्षेत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण देखील झाले. त्यानंतर २०१० मध्ये पीएसआय म्हणून लातूर, परभणी त्यानंतर पुण्यात रुजू झाले. आता माझ्याकडे भरोसा विभागात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून काम करीत आहे,” असं सुजाता सांगतात. तसेच प्रत्येक ठिकाणी काम करताना वेगळच शिकण्यास मिळाले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

सुजाता शानमे यांची क्रिडा क्षेत्रातील कामगिरी थोडक्यात :

खो खोमध्ये २६ राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी सहभाग नोंदवला आहे. त्यामध्ये १० गोल्ड, ६ सिल्व्हर आणि ३ ब्रॉझ पदकं मिळवली आहेत. तर भारतीय ऑलिंपिक स्पर्धेत आसाम गुवाहाटी येथे सुवर्णपदक मिळवत त्यावेळी ५० हजार रूपयांची स्कॉलरशिप देखील मिळाली. तसेच दोन वेळ महाराष्ट्र संघाचं कर्णधारपदही भूषवलं आहे. ही सर्व कामगिरी लक्षात घेता राज्य सरकारमार्फत शिवछत्रपती क्रिडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

खेळाकडे करिअर म्हणून पाहण्याची गरज

सध्या अनेक क्षेत्रात स्पर्धा पाहण्यास मिळत असून सर्वाधिक क्रिडा क्षेत्रात आहे. त्यामुळे तरुणाईने अधिकाधिक मैदानी खेळाकडे लक्ष द्यावे. प्रत्येकाने किमान एखाद्या तरी खेळात सहभागी व्हावे, जेणेकरून आपल्या देशाला नवनवीन खेळाडू मिळण्यास मदत होईल. तसेच सर्वात प्रथम तरुणांनी खेळाकडे करिअर म्हणून पाहण्याची आवश्यकता असल्याची भावना सुजाता शानमे यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2021 8:28 am

Web Title: womens day special sujata shanme journey from kho kho player to assistant police inspector in pune svk 88 scsg 91
Next Stories
1 महिला आमदार समाजमाध्यमांवर ‘दिनविशेष’ पुरत्याच!
2 मामाच्या भेटीला निघालेल्या सात वर्षीय चिमुकलीचा अपघाती मृत्यू
3 गुंड गजा मारणे सातारा पोलिसांकडून पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात
Just Now!
X