पिंपरीतील फूलबाजाराचे आज उद्घाटन :- पिंपरी येथील उप बाजार समितीला महापालिकेने फूल बाजारासाठी गाळे बांधून दिले आहेत. पिंपरी उड्डाण पुलाजवळ असलेल्या फूल बाजाराची काही कामे अर्धवट आहेत. तसेच महापालिकेने हे गाळे बाजार समितीकडे हस्तांतर केलेले नाहीत. फूल बाजारातील विविध कामे अपूर्ण असताना महापौर राहुल जाधव यांनी फूलबाजाराच्या उद्घाटनाचा घाट घातला असून फूलबाजाराचे उद्घाटन गुरुवारी (७ नोव्हेंबर) करण्यात येणार आहे.

पिंपरीतील फूल बाजार शगून चौकात रस्त्यावर सुरू होता. बाजारासाठी अपुरी जागा असल्यामुळे फूल व्यापाऱ्यांचे हाल होत होते. बाजार समितीने पाठपुरावा करून महापालिकेकडून पिंपरी उड्डाण पुलाजवळ फूलबाजारासाठी जागा घेतली. तसेच महापालिकेने फूलबाजाराचे गाळे बांधले आहेत. फूलबाजाराचे काम पूर्ण झाल्यानंतर तेथील गाळे बाजार समितीकडे हस्तांतरित करण्यात येणार आहेत.

फूल बाजारातील गाळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, स्वच्छतागृह तसेच पाण्याची सुविधा निर्माण करण्याचे काम अपूर्ण आहे. वीज जोडणीही करण्यात आलेली नाही. तसेच फूलबाजारात येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विश्रांतीगृह तयार करण्यात आलेले नाही. त्यामुळे महापालिकेने   फूलबाजारातील गाळे बाजार समितीकडे हस्तांतरित केलेले नाहीत.

अशी परिस्थिती असताना महापौर राहुल जाधव यांच्याकडून फूलबाजाराच्या उद्घाटनाचा घाट घालण्यात आला आहे. आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते फूलबाजाराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, राष्ट्रवादी  काँग्रेसचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे उपस्थित राहणार आहेत. महापौर राहुल जाधव यांचा कार्यकाल संपत आला आहे. त्यामुळे त्यांनी आपल्याच कार्यकाळात फूलबाजाराचे उद्घाटन व्हावे यासाठी कार्यक्रमाचा घाट घालण्यात आला असल्याची चर्चा आहे.

पिंपरीतील शगुन चौकातील रस्त्यावर फूलबाजार सुरू आहे. पावसामुळे तेथे व्यापाऱ्यांचे खूप हाल होत आहेत. त्यामुळे त्यांना गाळे लवकर मिळावेत यासाठी उद्घाटनाची घाई करण्यात आली आहे. इतर प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार आहेत.  – राहुल जाधव, महापौर, पिंपरी-चिंचवड महापालिका