कामचुकारपणा, पाटय़ा टाकण्याची प्रवृत्ती, दर्जाहीन शिक्षण अशा आरोपांमुळे सतत टीकेच्या केंद्रस्थानी असलेल्या पिंपरी महापालिकेतील शाळांमधील शिक्षकांचे आता ‘ब्रेन वॉश’ करण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षण मंडळाच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असून शिक्षण क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींसह पालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांचे मार्गदर्शन पालिकेच्या सुमारे १३०० शिक्षकांना लाभणार आहे.
पिंपरी पालिकेचे शिक्षण मंडळ आतापर्यंत खरेदी व त्यातून उद्भवणाऱ्या अन्य वादामुळे नेहमीच चर्चेत राहिले आहे. विद्यार्थी हिताचे निर्णय होण्यापेक्षा मंडळामध्ये टक्केवारीचेच राजकारण अधिक चालते, हे उघड गुपित आहे. महापालिका शाळांची दुरवस्था कायम असून विद्यार्थ्यांच्या अडचणी वर्षांनुवर्षे तशाच आहेत. मात्र, त्याकडे ढुंकूनही पाहिले जात नाही. उन्हाळ्यात रेनकोट आणि पावसाळ्यात स्वेटर देण्याची थोर परंपरा असलेल्या मंडळाकडून शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना साहित्य उपलब्ध करून देऊ, अशी घोषणा दरवर्षी केली जाते. प्रत्यक्षात त्यादृष्टीने कार्यवाही होत नाही. अशैक्षणिक कामांमुळे त्रस्त असलेल्या बहुतांश  शिक्षकांना शिकवण्याच्या कामात फारसा उत्साह नसून राजकारणात नको इतके स्वारस्थ्य असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. अशा कारणांमुळेच पालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा नको इतका खालावला आहे.
अशा परिस्थितीत, शिक्षणाची मानसिकता हरवून बसलेल्या शिक्षकांचे ‘ब्रेन वॉश’ करण्याच्या निर्णयापर्यंत मंडळाचे प्रशासन आले की काय, असे बोलले जाते. या कार्यशाळेनंतर तरी शिक्षकांची मरगळ दूर होईल का, त्यांची मनोवृत्ती सुधारेल का आणि पालिका शाळांचा दर्जा उंचावेल का, याविषयी साशंकताच व्यक्त करण्यात येते.
या संदर्भात, शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी अशोक भोसले म्हणाले, २९ जूनला ही कार्यशाळा आयोजित करण्याचा मानस आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. मात्र, याविषयीचा अंतिम निर्णय आयुक्त घेतील. महापालिकेच्या शाळांमध्ये १३०० शिक्षक असून ५० हजार विद्यार्थी आहेत. ब्रेन वॉश करण्याच्या हेतूने आयोजित या कार्यशाळेचा शिक्षकांना निश्चितपणे फायदा होईल व नव्या जोमाने नव्या वर्षांत ते कामाला लागतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.