पुस्तक हाताळणारे हात केव्हा वाढणार?: प्रकाशन विश्व चिंतेत

वाचनाची आवड कमी होत असल्याची तक्रार केली जात असतानाच, आपल्याला भरभराटीचे दिवस केव्हा येणार याची पुस्तकांनाही प्रतीक्षा आहे. विविध उपक्रमांनी जागतिक पुस्तक दिन सोमवारी (२३ एप्रिल) साजरा होत असताना पुस्तकांना हाताळणारे हात केव्हा वाढणार, हा प्रश्न प्रकाशन विश्वाला सतावत आहे.

article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
Indian Foreign reserves at a record high
परकीय गंगाजळी ६४८.५६ अब्ज डॉलरच्या उच्चांकी पातळीवर
High rate of gold prices in the domestic market
सोन्याचा सार्वकालिक उच्चांक; मुंबईत तोळ्यामागे घाऊक भाव ७०,४७० रुपयांवर
chess
भारतीय बुद्धिबळपटू सज्ज; प्रतिष्ठेच्या ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेला आजपासून प्रारंभ

युनेस्कोतर्फे २३ एप्रिल हा ‘जागतिक पुस्तक दिन’ म्हणून साजरा केला जातो. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे सध्याच्या काळात पुस्तक हाती घेऊन वाचण्यापेक्षाही ऑनलाईन वाचन करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्याचा थेट परिणाम पुस्तकांच्या विक्रीवर झाला आहे. प्रकाशकांची पाचशे ते एक हजार पुस्तकांच्या प्रतींची आवृत्ती खपण्यासाठी दीर्घ कालावधी लागत आहे. नोटाबंदीच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका बसल्यानंतर प्रकाशन व्यवसाय अद्यापही त्यातून सावरलेला नाही. वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी सवलतीच्या दरात पुस्तकांची विक्री करण्याचा मार्ग प्रकाशकांनी स्वीकारला आहे. मात्र, या योजनेलाही वाचकांकडून पुरेसा प्रतिसाद लाभत नाही, असे चित्र दिसून येते. वाचकांना आकर्षित करणारी पुस्तक प्रदर्शने जवळपास बंद झाली असून पुस्तकांच्या उलाढालीचे एक केंद्र ठप्प झाले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्याला भरभराटीचे दिवस केव्हा येणार, अशी चिंता पुस्तकांनाच भेडसावत आहे.

प्रकाशन व्यवसायामध्ये सध्या ‘मागील पानावरून पुढे सुरू’ अशीच परिस्थिती आहे. पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचवावीत या उद्देशाने राजहंस प्रकाशनने सवलत जाहीर केली आहे. मात्र, त्याला प्रतिसादही बेताचाच आहे. पुस्तक विक्रीच्या क्षेत्रामध्ये सध्या मंदीचे वातावरण जाणवत आहे, असे राजहंस प्रकाशनचे डॉ. सदानंद बोरसे यांनी सांगितले. पद्मगंधा प्रकाशनतर्फे प्रामुख्याने वैचारिक साहित्य आणि समीक्षापर पुस्तकांची निर्मिती केली जाते. मात्र, राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये मराठी विषयाच्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्याचा फटकादेखील पुस्तकांच्या विक्रीला बसला आहे, असे पद्मगंधा प्रकाशनचे अरुण जाखडे यांनी सांगितले.

पुस्तक दालनाचा गौरव

जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून सोमवारी (२३ एप्रिल) पब्लिशिंग नेक्स्ट संस्थेतर्फे ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या हस्ते अक्षरधारा बुक गॅलरीला ‘बुक शॉप ऑफ द इयर’ हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. उत्तरार्धात ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ.भालचंद्र नेमाडे यांच्याविषयी अक्षय इंडीकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘उदाहरणार्थ नेमाडे’ हा लघुपट दाखविण्यात येणार आहे. मयूर कॉलनी येथील बाल शिक्षण मंदिर सभागृह येथे सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

मुद्रितशोधकांचा सन्मान

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे रविवारी  संस्कृतच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सरोजा भाटे यांच्या हस्ते मुद्रितशोधनाच्या माध्यमातून पुस्तक निर्मितीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या गोपाळराव कुलकर्णी, विजय सरदेशपांडे, मिलिंद बोरकर, रमेश भंडारी, विजय जोशी, जयश्री हुल्याळकर, प्रा. गिरीश झांबरे, अनुश्री भागवत, आरती घारे, रुपाली अवचरे, उल्का पासलकर, नरेंद्र आढाव आणि प्रदीप गांधलीकर या प्रातिनिधिक मुद्रितशोधकांचा सन्मान करण्यात येणार आहे. परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृह येथे सकाळी साडेदहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.