स्तनपान सप्ताहानिमित्त दुग्धपेढय़ांचे आवाहन

पुणे : मुदतपूर्व जन्मलेल्या बालकांना काही कारणाने आईचे दूध मिळणे शक्य नसेल तर दुग्धपेढीत साठवलेले आईचे दूध त्यांच्यासाठी गुणकारी ठरते. त्यामुळे स्तनदा आईने आपल्या बाळाला पाजून शिल्लक राहिलेले दूध दुग्धपेढीला दान करावे, असे आवाहन शहरातील दुधपेढय़ांमार्फत करण्यात आले आहे. दुग्धपेढीमार्फत ते दूध गरजू बालकांना दिले जाईल.

ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा स्तनपान जागृती सप्ताह म्हणून साजरा के ला जातो. या निमित्ताने स्तनपानाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी विविध उपक्रम घेतले जातात. पुणे शहरात पाच दुग्धपेढय़ा कार्यरत आहेत. विशेष म्हणजे करोना टाळेबंदीच्या काळातही या दुग्धपेढय़ांचे काम अव्याहत सुरू होते. बाळाचा जन्म झाल्यानंतर कोणत्याही वैद्यकीय कारणामुळे आई बाळाला दूध पाजू शकत नसेल तर दुग्धपेढीतील दूध बाळाला दिले जाते.

अलीकडच्या काही वर्षांमध्ये बाळाचा जन्म मुदतपूर्व (प्रिमॅच्युअर) होण्याचे प्रमाण वाढल्याने दुग्धपेढीत पुरेसे दूध संकलन ठेवणे महत्त्वाचे ठरते. या पार्श्वभूमीवर आईने आपल्या बाळाला पोटभर दूध पाजून शिल्लक राहिलेले दूध दुग्धपेढीला दिले असता त्याचा उपयोग गरजू बाळाला होतो, तसेच दूधदात्या आईसाठीही त्याचे वैद्यकीय उपयोग असतात.

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या स्तनपान सल्लागार डॉ. विशाखा हरीदास म्हणाल्या, आईच्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या के ल्यानंतर आम्ही तिच्याकडून मिळालेले दूध दुग्धपेढीत ठेवतो. जन्माला आलेल्या बाळाला पहिले सहा महिने के वळ स्तनपान देणे त्याच्या निरोगी भविष्यासाठी आवश्यक असते. त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर आई आजारी असेल किं वा दगावली असेल तर अशा बाळासाठी दुग्धपेढीचे दूध अत्यंत महत्त्वाचे ठरते. दुग्धपेढीत आलेले दूध सहा महिन्यांपर्यंत साठवून ठेवले जाते. त्यामुळे ज्या आईला दूध दान

करायचे आहे, तिने जवळच्या दुग्धपेढीला संपर्क  साधावा. काही दुग्धपेढय़ा घरून दूध संकलन करतात. त्यामुळे आईला दूधदानासाठी रुग्णालय किं वा दुग्धपेढीत जावे लागत नाही.

पुणे शहरातील दुग्धपेढय़ा

’ मिल्क बँक, ससून हॉस्पिटल.

’ माई मदर्स मिल्क बँक, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल.

’ यशोदा मिल्क बँक, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, पिंपरी.

’ मिल्क बँक सह्य़ाद्री हॉस्पिटल, नगर रस्ता.

’ नेक्टर मिल्क बँक, के ईएम हॉस्पिटल, पुणे.