News Flash

जागतिक नृत्य दिन यंदा घरातूनच

आधुनिक बॅलेचा जनक जीन जॉर्जेस नोरेन यांचा जन्मदिन २९ एप्रिल हा दिवस जागतिक नृत्य दिन म्हणून साजरा केला जातो.

(संग्रहित छायाचित्र)

करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमांना बंदी असल्याने जागतिक नृत्य दिन गुरुवारी (२९ एप्रिल) घरातूनच साजरा करण्यात येणार आहे. शहरातील सर्व नृत्यसंस्थांचा सहभाग असलेल्या शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेतर्फे ऑनलाइन स्वरूपात पन्नासहून अधिक नृत्यरचना सादर करीत सकारात्मक ऊर्जा जागविणार आहेत. करोना निर्बंधांमुळे राज्यातील काही नृत्य संस्थांनी कार्यक्रम स्थगित केले असून काही संस्था ऑनलाइन स्वरूपात कार्यक्रम करणार आहेत.

आधुनिक बॅलेचा जनक जीन जॉर्जेस नोरेन यांचा जन्मदिन २९ एप्रिल हा दिवस जागतिक नृत्य दिन म्हणून साजरा केला जातो. करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याच्या उद्देशातून सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेतर्फे ऑनलाइन कार्यक्रमाद्वारे जागतिक नृत्य दिन साजरा करण्यात येणार आहे. भरतनाट्यम, कथक, कुचिपुडी, मोहिनीअट्टम या शैलीतील कलाकारांनी सादर केलेला नृत्याविष्कार रसिकांना गुरुवारी दिवसभर संस्थेच्या https://www.facebook.com/Shastriya-nritya-Samvardhan-Sanstha-1551095995034962/ या फेसबुक पेजवर घरबसल्या पाहता येणार आहे. ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यगुरू डॉ. सुचेता भिडे-चापेकर, ज्येष्ठ कथक नृत्यगुरू शमा भाटे आणि मनीषा साठे यांनी शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेची स्थापना केली आहे.

करोनामुळे सारे काही ठप्प झाले असले, तरी नृत्य करण्याची उमेद अजून टिकून आहे हेच पुण्यातील कलाकार एकत्रितपणे आपला कलाविष्कार सादर करून सिद्ध करणार आहेत. नृत्याच्या क्षेत्रात पुण्याला जागतिक नकाशावर मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेल्या शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेतर्फे विविध संस्थांना पाच ते सात मिनिटे कालावधीच्या सादरीकरणाचे व्हिडिओ पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला उत्तम प्रतिसाद लाभला असून जागतिक नृत्य दिन साजरा करताना विविध नृत्यशैलींद्वारे कलाकार समाजातील सकारात्मक ऊर्जा जागृत करण्याचे काम करणार आहेत.

– शमा भाटे, ज्येष्ठ कथक नृत्यगुरू

 

जागतिक नृत्य दिनानिमित्त मी दरवर्षी कार्यक्रमाचे आयोजन करते. यंदा निर्बंधांमुळे कार्यक्रम घेणे शक्य होणार नाही. ऑनलाइन स्वरूपात कार्यक्रमामध्ये नृत्य अनुभवता येत नाही.

– झेलम परांजपे, ज्येष्ठ ओडिसी नृत्यांगना, स्मितालय संस्थेच्या संचालिका, मुंबई

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 1:05 am

Web Title: world dance day this year from home abn 97
Next Stories
1 पुढील तीन दिवस राज्यभर पाऊस
2 करोना चाचणी धोरणात बदलाची गरज!
3 शाळाबाह््य मुलांमध्ये २८८ बालकामगार
Just Now!
X