पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांचे मत

देशाला लागणारे ८० टक्के इंधन आपण आयात करतो आणि केवळ २० टक्के इंधन हे देशांतर्गत तयार करून वापरले जाते. ज्या पद्धतीने आपल्या देशाची प्रगती होत आहे त्यावरून येणाऱ्या काळात आज वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा वापर तीन पटीने वाढेल. पुढील काळात ऊर्जा क्षेत्रातील प्रगतीमध्ये २५ टक्के भाग हा भारतात असणार आहे. सध्या जगातील सर्वात मोठी ऊर्जेची बाजारपेठ भारतात असून पुढील काळात त्याचे प्रमाण वाढणार आहे, असे मत पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने हाती घेतलेल्या पुण्यातील पाच हजार दुचाकींना सीएनजी कीट बसविण्याच्या उपक्रमाचे उद्घाटन प्रधान यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, महापालिका सभागृहनेते श्रीनाथ भीमाले, गेल इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बी. सी. त्रिपाठी, बीपीसीएलचे कार्यकारी संचालक आय. एस. राव, एमएनजीएलचे स्वतंत्र संचालक राजेश पांडे, व्यवस्थापकीय संचालक अरिवद तांबेकर, संचालक वाणिज्य संतोष सोनटक्के या वेळी उपस्थित होते.

प्रधान म्हणाले,‘ सध्या निसर्गात मोठी विसंगती दिसून येत आहे. निसर्गाकडे दुर्लक्ष होत असल्याने दुष्परिणामांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे केवळ भारतातीलच नाही, तर जबाबदार देश या नात्याने संपूर्ण जगातील प्रदूषण कसे कमी होईल, यासाठी आपण वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या पाहिजेत. भारतामधील शहरात, जंगलातील टाकाऊ वस्तूंतून ऊर्जा निर्मिती कशी होईल याबाबत संशोधन करण्याची आवश्यकता आहे.’

बापट म्हणाले,की पुण्यात मोठय़ा संख्येने दुचाकी वाहने आहेत. पुण्यातील प्रदूषण कमी होण्यासाठी एमएनजीएल प्रयत्न करीत आहेत. पुण्यामध्ये मोठय़ा कंपन्या आल्या, परंतु प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. संपूर्ण देश प्रदूषणमुक्त होण्यासाठी पुण्यातूनच सुरुवात व्हायला हवी.

पुणे जैवइंधनाचे मध्यवर्ती केंद्र

महाराष्ट्र नॅचरल गॅसच्या ग्राहक संख्येत सध्या मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे.  सीएनजीच्या माध्यमातून प्रदूषणमुक्त पुण्यासाठी प्रयत्न होत आहेत. मुंबई आणि दिल्लीपेक्षा पुण्यातील नागरिक मोठय़ा प्रमाणात सीएनजीकडे वळत आहेत. सीएनजी वापरासाठी जनआंदोलन उभे राहायला हवे. पुणे ही देशाची संपत्ती आहे. हे शहर प्रदूषणमुक्त ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वाची आहे. सीएनजीचा वापर करीत लवकर प्रदूषण मुक्तीकडे वळाल्याने पुणे हे जैवइंधनाचे मध्यवर्ती केंद्र होणार, असे धर्मेद्र प्रधान यांनी सांगितले.