04 July 2020

News Flash

world mental health day : लहान मुलेही नैराश्याच्या फेऱ्यात

गेली अनेक वर्षे मुलांमध्ये नैराश्य, अति चंचलता यांसारखी लक्षणे आढळत आहेत.

पालकांसाठी धोक्याची घंटा, डॉक्टरांकडून खबरदारीचा इशारा

आज जागतिक मानसिक आरोग्य दिन

भक्ती बिसुरे, पुणे 

ताणतणाव हा सध्या सर्वाच्या आयुष्यातील परवलीचा शब्द आहे. वेगवान जीवन, कामाच्या ठिकाणी असलेली स्पर्धा आणि दगदग यांमुळे प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या तणावाला सामोरा जात असतो. मात्र या तणावाच्या आजाराने मानवी वयाचा फरक मोडला असून सध्या लहान मुलेदेखील मोठय़ा प्रमाणावर ताणतणावांना सामोरी जात आहेत. सहा ते सात वयातील बालके डिप्रेशनचे रुग्ण म्हणून मानसोपचार तज्ज्ञांकडे येण्याचे प्रमाण हळूहळू वाढत असल्याचे दिसून येत आहे.

औरंगाबाद येथे कार्यरत असलेले डॉ. अमोल देशमुख यांनी सांगितले की, लहान मुलांना मानसोपचारांसाठी घेऊन येणारे पालक हे आता नवखे चित्र राहिलेले नाही. शरीराची रोगप्रतिकार शक्ती असते तशी ती मनाचीदेखील असते. आजूबाजूला घडणाऱ्या बदलांना सामोरे जाण्याची प्रत्येक व्यक्तीची मानसिक प्रतिकार शक्ती वेगळी असते.  लहान मुलेही याला अपवाद नाहीत.

कोल्हापूर येथे मानसोपचारतज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेले डॉ. देवव्रत हर्षे म्हणाले, गेली अनेक वर्षे मुलांमध्ये नैराश्य, अति चंचलता यांसारखी लक्षणे आढळत आहेत. सध्या त्याबाबत जागरूकता वाढल्याने ही मुले डॉक्टरांपर्यंत येतात ही गोष्ट सकारात्मक आहे. डिसलेक्सियाने ग्रासलेली किंवा झोपेत बिछाना ओला करणारी मुले यांनादेखील उपचारांची गरज आहे, मात्र त्याबाबत म्हणावी तेवढी जागरूकता अद्याप दिसत नाही. आजाराचे स्वरूप आणि रुग्णाच्या नातेवाईकांची स्वीकारार्हता यानुसार लहान मुलांच्या मानसिक आजारांवर उपचार करण्याचा प्रयत्न असतो.

जगभरामध्ये लहान मुलांच्या मानसिक आरोग्याचे प्रश्न वाढत आहेत आणि त्याचे भारतातील प्रमाणदेखील प्रचंड आहे. अभ्यास आणि अभ्यासेतर गोष्टींमध्ये मुलांना पूर्णवेळ जखडून टाकणे, मोबाइल, इंटरनेट, गेम्स यांसारख्या गोष्टींचा अतिरेकी वापर मुलांकडून होताना कानाडोळा करणे किंवा प्रोत्साहन देणे या गोष्टी याला प्रामुख्याने कारणीभूत आहेत. पालकांनी मुलांना सकारात्मक शिस्त लावणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात शाळा, शिक्षक आणि इतर घटकांनी शिस्त लावावी असा पालकांचा कल दिसतो. तो पूर्णत अयोग्य आहे.

डॉ. भूषण शुक्ल, बाल मानसोपचारतज्ज्ञ, पुणे

 

होतेय काय?

सर्वसाधारणपणे सहा-सात वर्षे वयापासून पंधरा वर्षे वयापर्यंतच्या मुलांमध्ये नैराश्य, चंचलपणा, अस्थिरता ही लक्षणे दिसण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचा परिणाम त्यांच्या शारीरिक आरोग्यावर होतो. त्यामुळे अनेकदा त्यांना मानसोपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. बाह्य़रुग्ण विभागात लहान मुले उपचारांसाठी येण्याचे प्रमाण दहा ते पंधरा टक्के एवढे असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

याकडे लक्ष द्या..

अभ्यासात अत्यंत हुशार असलेले सहा ते सात वर्षांचे मूल अचानक मागे पडत असेल, सतत काही तरी दुखत असल्याची तक्रार करीत असेल, त्याला भूक लागत नसेल, चिडचिड वाढत असेल, शाळा नको वाटत असेल, मित्र-मैत्रिणी किंवा भावंडांबद्दल राग दाटून येत असेल तर अशा मुलांकडे पालकांनी अधिक लक्ष देणे आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2019 4:30 am

Web Title: world mental health day children also suffer from depression zws 70
Next Stories
1 टेमघर धरण दोन वेळा  भरेल एवढा पाऊस
2 वडगावशेरी मतदारसंघात सर्वाधिक मतदारांची नोंद
3 दत्ता बहिरट यांच्या प्रचाराची धुरा चारूकडे
Just Now!
X