‘तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला’ या गीताची प्रचिती चारशेहून अधिक महिलांना देत धनश्री हेन्द्रे यांनी मेंदी काढण्याची विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. चारशेपक्षा अधिक हातांवर मेंदीच्या रेखाटनाची किमया साकारताना धनश्री यांनी ३२ तासांमध्ये केवळ दोनदा दहा मिनिटांची विश्रांती घेतली.
 सर्वाधिक काळ मेंदी रेखाटण्याचा विक्रम यापूर्वी अहमदाबाद येथील दीप्ती देसाई यांच्या नावावर होता. त्यांनी २८ एप्रिल २०११ रोजी २४ तास ४५ मिनिटे या वेळात १७० हातांवर मेंदी काढली होती. दीप्ती देसाई यांच्या या विक्रमाची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली होती. हा विक्रम मोडण्याच्या उद्देशातून धनश्री हेन्द्रे यांनी ३२ तास मेंदी काढण्याचा संकल्प केला. वेदशास्त्रोत्तेजक सभा संस्थेचे सभागृह येथे मंगळवारी (२५ मार्च) रोजी सकाळी दहा वाजता या विक्रमाचा शुभारंभ झाला. पहाटे साडेचार वाजताच त्यांनी २२० हातांवर मेंदी काढण्याचे लक्ष्य साध्य करून दीप्ती देसाई यांचा विक्रम मागे टाकला. बुधवारी सायंकाळी सहा वाजता या विक्रमाची सांगता झाली. अखेरच्या हातावर मेंदी रेखाटताना धनश्री यांचे हात थकले नव्हते. हा विक्रमाचा संकल्प पूर्ण झाला तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून धनश्री यांचे कौतुक केले.
मृगनयनी मेहंदी आर्ट अँड क्लासेसच्या संचालिका असलेल्या धनश्री हेन्द्रे यांच्या ३२ तास मेंदी काढण्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. हे चित्रीकरण लवकरच लिम्का बुककडे पाठविले जाणार आहे. आपल्या हातावर मेंदी काढून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या सर्वाना मोफत प्रवेश देण्यात आला होता. त्यामुळे सणवार नसतानाही मेंदी काढून घेण्यासाठी गर्दी झाली होती. एका हातावर किमान आठ ते नऊ मिनिटांमध्ये नक्षीदार मेंदी रेखाटली गेली. साधारणपणे एका तासाला ११ ते १२ हात नयनरम्य मेंदीच्या कलाकुसरीने रंगले होते.
धनश्री या मूळच्या नगरच्या. मनोज हेन्द्रे यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या पुण्यामध्ये वास्तव्याला आल्या. शुक्रवार पेठेतील बाफना पेट्रोल पंप परिसरामध्ये हे दांपत्य वास्तव्यास आहे. हेन्द्रे यांनी पत्नीच्या या कला शिक्षणाला प्रोत्साहन देत त्यांना क्लासेस सुरू करण्यासाठी सहकार्य केले. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कामास असलेल्या मनोज यांनी धनश्री यांनी मेंदी काढण्याच्या विश्वविक्रमासाठी पाठबळ दिले. एवढेच नव्हे तर, चक्क रजा काढून ते पत्नीला सर्वतोपरी मदत करीत होते.

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
There is a possibility of a code of conduct for the upcoming Lok Sabha elections
पिंपरी: आचारसंहितेच्या शक्यतेने राजकारण्यांप्रमाणेच प्रशासकांचीही धावपळ; तब्बल ‘इतक्या’ कोटींच्या कामांना मंजुरी
mumbai ban on slum demolition marathi news, slums mumbai marathi news
झोपडपट्टी पुनर्विकासात परवानगीविना अतिरिक्त झोपड्या तोडण्यावर बंदी, नव्या परिपत्रकामुळे झोपडीवासीयांना दिलासा
Sanjay Raut ANI
“मविआचं जागावाटप पार पडलं, तिन्ही पक्षांमध्ये…”, बैठकीनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; वंचितच्या मागणीवर म्हणाले…