‘माझ्या कानात सारखे वेगवेगळे आवाज यायचे, रात्री झोपल्यावर भयानक स्वप्नं पडायची, माझा पलंग गदागदा हलायला लागायचा..मला काहीच करावंसं वाटायचं नाही, मी स्वत:ची स्वत: आंघोळ करायचे नाही, खायचे नाही, भांडी फेकून मारायचे..सगळे म्हणायचे माझ्यावर काहीतरी जादूटोणा झालाय,’..मूळची छत्तीसगडची असलेली मीना सांगत होती.
या कथित जादूटोण्यामुळे कंटाळलेली मीना ८ वर्षांपूर्वी घर सोडून मुंबईला आली. रस्त्यावर वणवण भटकू लागली. एका सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यां बाईंनी तिला पाहिले आणि पुढे मीना पुण्याला ‘माहेर’ संस्थेत आली. मीनाच्या मानसिक आजारावर उपचार सुरू झाले. आता ती बरी आहे. औषधे घेते आहे. तिच्यावर आता ‘जादूटोणा’ही होत नाही. इतकेच नव्हे, तर ती एका सोसायटीत स्वच्छतेचे काम करते, स्वत:चे पैसे साठवते. आता तिला लग्नही करावेसे वाटते. मधल्या काळात तिच्याशी संबंध तोडलेल्या वडील आणि भावंडांना ती आर्थिक मदत करते आणि ते देखील ती स्वीकारतात!
‘माहेर’ आणि ‘परिवर्तन’ या संस्थांतर्फे वडगाव शेरीत एकत्रितपणे चालवले जाणारे ‘उन्नती निवास’ हे मीनाचे सध्याचे घर. मानसिक आजाराने आयुष्य उद्ध्वस्त झालेल्या आणि ते पुन्हा प्रयत्नपूर्वक घडवलेल्या आणखी तीन मैत्रिणी या घरात राहतात. जागतिक स्किझोफ्रेनिया दिनाच्या निमित्ताने (२४ मे) ‘लोकसत्ता’ने या चौघींशी संवाद साधला. या प्रकल्पास ‘टाटा ट्रस्ट’चे अर्थसाहाय्य आहे.
भान नसलेल्या अवस्थेत ओडिशाहून मुंबईत येणाऱ्या आणि मुंबईतून मीनाप्रमाणेच पुण्यातल्या संस्थेत भरती केलेल्या सुनीतीची कहाणी आणखी हेलावून टाकणारी. नवऱ्याच्या मृत्यूनंतर सासरच्यांना ती घरात नको वाटू लागली. मग ती एकटीच कुढत बसू लागली. कुणी तिच्याशी बोलले की संतापायची. स्वत:च्या माहेरचे दारही बंद झाल्याचे लक्षात आल्यावर तिने दोन वर्षांपूर्वी भान हरपलेल्या स्थितीत घर सोडले. गेल्या चार महिन्यांपासून सुनीती ‘उन्नती’मध्ये राहते आहे, एके ठिकाणी रखवालदाराचे काम करत आहे. ती म्हणाली, ‘माझी लहान मुले ओडिशाला सासरी आहेत. त्यांना भेटावेसे वाटते, पण सासरी परत जावेसे वाटत नाही. मी पैसे जमवणार आहे. मुले थोडी मोठी झाली की मला त्यांच्याबरोबर राहायचे आहे..’
गोखलेनगरमध्ये राहणाऱ्या आणि मानसिक आजारामुळे घरातून बाहेर पडून गोखलेनगरमधल्याच रस्त्यावर ७-८ वर्षे उद्ध्वस्त जीवन जगलेल्या चंदाताई देखील मीना आणि सुनीतीबरोबर राहतात. मानसिक आजारावर उपचार घेऊन बऱ्या झालेल्या चंदाताईंना आता झाडायचे काम मिळाले आहे. त्यांनी ते स्वत:च शोधले आहे. आपल्याविषयी सतत आजूबाजूचे लोक वाईट बोलतायत असा संशय येऊन प्रचंड मानसिक ताण येणाऱ्या राधाताईही याच घरातल्या सदस्य. राधाताई नुकतेच एके ठिकाणी कचरा उचलण्याचे काम करु लागल्या आहेत. त्या म्हणाल्या, ‘माझ्या मुली निवासी शाळेत शिकतात. त्यांनी शिकायला हवे, शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय त्यांनी काम करावे असे वाटत नाही. पुढे मात्र मला त्यांच्याबरोबर राहावेसे वाटते.’
(बातमीतील सर्व नावे बदललेली आहेत)

‘मानसिक आजारांवर उपचार घेतानाच्या मधल्या काळात मानसिक रुग्णांनी रोजच्या जगण्यातील लहान- लहान कौशल्ये गमावलेली असतात. या रुग्णांनी बरे झाल्यावर स्वावलंबी बनणे खूप गरजेचे आहे. ‘उन्नती’सारख्या पुनर्वसन केंद्रातूनही त्यांनी एक दिवस स्वत:च्या मनाने स्वत:च्या हिमतीवर बाहेर पडावे आणि समाजातील इतर माणसांप्रमाणे त्यांनाही स्वतंत्रपणे जगता यावे अशी संकल्पना आहे.’
– शमिका बापट, मानसोपचार तज्ज्ञ, ‘परिवर्तन’

‘मानसिक आजारामुळे रस्त्यावर भटकणाऱ्या अनेकींच्या कुटुंबांचा पत्ता नसतो. काहींचे घर शोधण्यात यश मिळाले की त्यांचे नातेवाईक त्यांना पुन्हा रस्त्यावर सोडायचा सल्ला देतात. या प्रवृत्तीचे वाईट वाटते. मानसिक आजारांच्या रुग्णांना औषधोपचार मिळाले आणि त्यांना समजून घेतले तर ते चांगली प्रगती करु शकतात.’
– हिराबेगम मुल्ला, अध्यक्ष, ‘माहेर’