पुणे शहरात करोना विषाणूचे रुग्ण मोठया प्रमाणावर आढळत असून आज दिवसभरात ९९ रुग्ण आढळले आहेत, तर १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकाच दिवसात इतक्या रुग्णांचा मृत्यू झाल्याने, पुणे शहराच्या दृष्टीने ही चिंतेची बाब ठरली आहे.

पुणे शहरात मागील काही दिवसांत रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होताना दिसत आहे. रुग्ण संख्या आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने प्रशासनामार्फत अनेक उपाय योजना केल्या जात आहे. मात्र, त्याचदरम्यान आज दिवसभरात पुण्यात ९९ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आजअखेर २ हजार २४५ इतकी रुग्ण संख्या झाली आहे. तर आजच्या एकाच दिवसात १२ रुग्णांचा मृत्यू झाल्याने, १३७ आजअखेर मृतांची संख्या झाली आहे. एका बाजूला रुग्णांची आणि मृतांची संख्या वाढत असताना, दुसर्‍या बाजूला रुग्ण बरे होण्याच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. ही समाधानाची बाब असून आज दिवसभरात ६१ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर ७३२ इतकी संख्या झाली असल्याचे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले आहे.

पुणे विभागात २ हजार ८८५ करोनाबाधित – डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे विभागात करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत असून ही संख्या २ हजार ८८५ इतकी झाली आहे. तर आजअखेर १५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. तर याच दरम्यान आज अखेर ८३७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असल्याचेही त्यांनी सांगितले.