छायाचित्रे संकलन करण्याचा छंद पाहता पाहता केवळ माहितीचे भांडारच नाही, तर कुस्ती या क्रीडाप्रकाराचा ज्ञानकोशच झाला. कुस्तीसंबंधीचे छायाचित्र १९७८ मध्ये पहिल्यांदा विकत घेतले आणि तीन तपांच्या कालखंडानंतर आता हा संग्रह अडीच हजार छायाचित्रांचा टप्पा पार करून गेला आहे. कुस्तीच्या छायाचित्रांचा संग्रह करणारे हे संग्राहक आहेत अशोक जाधव. केवळ छायाचित्र संग्रहावरच न थांबता कुस्तीचा इतिहास शब्दबद्ध करण्याचा त्यांचा मानस आहे.

‘‘मी मूळचा कुस्तीगीर असल्याने या छंदाकडे आकृष्ट झालो. कुस्तीगीरांची छायाचित्रे जमा करण्यासाठी महाराष्ट्रच नव्हे, तर देशातील विविध राज्यांमध्ये माझा प्रवास झाला. ‘महाराष्ट्र केसरी’पर्यंत मजल गाठून कुस्तीमध्ये फार प्रावीण्य मिळविता आले नाही ही खंत होती. पण, या छायाचित्र संकलनाच्या उपक्रमामध्ये प्रावीण्य संपादन करून ही कसर भरून निघाली,’’ अशा शब्दांत अशोक जाधव यांनी आपल्या या अनोख्या छंदाची माहिती दिली. ‘‘हा छंद म्हणजे कुस्तीचा इतिहास किंवा या क्रीडाप्रकाराचा ज्ञानकोश आहे असे जाणकार सांगतात. तेव्हा मला माझ्या या छंदाचा अभिमान वाटतो. केवळ छायाचित्रांपुरताच मर्यादित असलेला हा इतिहास शब्दबद्ध करावा, अशी सूचना अनेकांनी मला केली आहे. उत्तम मराठी भाषेमध्ये लेखन करायला जमेल का या जाणिवेतून मी लेखन केले नाही. पाहूयात पुढे काय होते ते,’’ असेही जाधव म्हणाले.

जाधव यांनी सांगितले की, मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे माझे मूळ गाव. तेथेच वस्ताद विश्वनाथराव भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली १९७१ ते १९८५ या कालखंडात कुस्तीचे धडे गिरवले. शिक्षणासाठी कोल्हापूर येथे गेल्यावर मठ तालीम येथे मल्लविद्येचे प्रशिक्षण घेतले. ‘तळेगाव केसरी’ हा किताब पटकाविल्यानंतर शालेय स्पर्धेत जिल्हा स्तरावर ५१ किलो गटामध्ये सुवर्णपदकाचा मानकरी ठरलो, तर विभागीय पातळीवर रौप्यपदक पटकाविले. लाहोर येथील सादिक पंजाबी आणि मारुती माने हे १९७८ मध्ये सरावासाठी मठ तालमीमध्ये येत असत. सराव करतानाची त्यांची छायाचित्रे मी स्टुडिओतून दोन रुपयांना विकत घेतली. त्यानंतर कुस्तीगीरांची छायाचित्रे जमा करण्याचे वेड लागले. महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी तालुक्यातून माझी निवड झाली. मात्र, जिल्हा स्तरावर निवड होऊ शकली नसल्याने कुस्तीगीर म्हणून नाव कमावता आले नाही. ती उणीव या छंदाने पूर्ण केली. यामध्ये १९२० पासूनचे महाराष्ट्राचे ऑलिम्पिकवीर, आशियाई वीर, राष्ट्रकुलवीर अशा विविध स्पर्धेतील विजेत्या तसेच सहभागी मल्लांचा समावेश आहे.

‘‘पूर्वी छायाचित्र जमा करण्यासाठी कधी एसटीने, कधी बैलगाडीने प्रवास करून मी संबंधित कुस्तीगीरांच्या घरी गेलो आहे. आता तंत्रज्ञानाची प्रगती झाल्यामुळे गेल्या काही वर्षांत ई-मेल, व्हॉटस अ‍ॅप या माध्यमातून छायाचित्रे माझ्याकडे येतात. डेव्हलिपग करून त्या छायाचित्राची प्रत काढून संग्रही ठेवण्याच्या कामामध्ये कुटुंबीयांचे सहकार्य मिळते. कुस्तीगीर होऊ शकलो नाही तरी अनेक कुस्तीगीरांशी परिचय करून दिला याचा आनंद आहे,’’ असेही जाधव यांनी सांगितले.

प्रदर्शन आज खुले

कुस्तीच्या दीडशे वर्षांचा प्रवास उलगडणाऱ्या अशोक जाधव यांच्या संग्रहातील छायाचित्रांचे प्रदर्शन माजी उपमहापौर आबा बागूल यांनी भरवले असून सहकारनगर येथील पं. भीमसेन जोशी कलादालन येथे ते शुक्रवापर्यंत (२० मे) सकाळी आठ ते अकरा आणि दुपारी चार ते आठ या वेळात खुले राहणार आहे.