एक लाख लेखक आणि एक कोटी वाचक यांना सजग करीत जोडण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून साहित्य सेतू ही संस्था काम करणार आहे. लेखकांना वेगवेगळ्या विषयांवरचे ज्ञान देत त्यांना अद्ययावत करण्यासाठी संस्था कार्यरत राहणार आहे.
मराठी वाचन संस्कृती, साहित्यिक, प्रकाशक यांच्यासंदर्भात अनेकदा चर्चा आणि लेखनही होते. मात्र, या सर्वामध्ये प्रत्यक्ष वाचक आणि लेखक यांच्यामध्ये एकत्र संवादाची व्यवस्था नाही. पूर्णत: व्यावसायिक लेखक मराठी साहित्यविश्वात अपवादानेच आढळतात. याचे कारण तसे होता येते हेच आपल्याकडे माहीत नाही. व्यावसायिक लेखक होण्यासाठी मार्गदर्शनपर सेवा पुरविणे ही आजची गरज आहे. हे ध्यानात घेऊन साहित्य सेतू संस्था लेखकांना सोयी-सुविधा पुरविणार आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या जगात लेखकाने इंटनरनेट, ई-मेल, व्हॉट्स अ‍ॅप, गुगल प्लस या आधुनिक साधनांशी कसे जुळवून घ्यावे या विषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे प्रा. क्षितिज पाटुकले आणि सुषमा शितोळे यांनी दिली.
गरवारे महाविद्यालयाचे कम्युनिटी कॉलेज सभागृह येथे रविवारी (३० नोव्हेंबर) सकाळी दहा वाजता लेखिका प्रा. वीणा देव यांच्या हस्ते साहित्य सेतू संस्थेचा शुभारंभ होणार आहे. या निमित्ताने ‘सक्षम लेखक आणि ई-जागरूक लेखक’ कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये लेखक-प्रकाशक करार, रॉयल्टी- मानधन कसे आणि किती, कॉपीराइट म्हणजे काय, पुस्तकनिर्मिती आणि वितरण प्रक्रिया, लेखक बनू शकतो का प्रकाशक, आर्थिक नियोजन, एका आवृत्तीचे अर्थकारण, स्वतंत्र लेखक म्हणून करिअर, लेखक – टीआरपी आणि फॅन क्लब, ई-बुक म्हणजे काय, लेखकाचे स्वत:चे ई-पोर्टल या विषयांवर लेखकांना राजेंद्र खेर, विनायक लिमये, शैलेंद्र बोरकर, सुषमा शितोळे आणि क्षितिज पाटुकले मार्गदर्शन करणार आहेत. या विषयी अधिक माहितीसाठी ९७६४१३९५५८ किंवा २५५३०३७१ या क्रमांकावर संपर्क साधावा.