शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी पालिकेच्या अधिकृत फलकांवर संभाजी महाराजांचे छायाचित्र छापण्याचा ‘प्रताप’ पुणे महापालिकेने केल्यामुळे शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला. शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर हे फलक बुधवारी सकाळी लागल्यानंतर घडलेली चूक लक्षात आल्यावर महापौर चंचला कोद्रे यांनी पुणेकरांची आणि शिवप्रेमींची माफी मागितली.
शिवजयंतीनिमित्त बुधवारी पुणे महापालिकेतर्फे मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीच्या मार्गावर भवानी माता मंदिरापासून लक्ष्मी रस्त्यामार्गे शनिवारवाड्यापर्यंत विविध ठिकाणी पालिकेने फलक लावले होते. या फलकांवर शिवाजी महाराजांऐवजी संभाजी महाराजांचे छायाचित्र छापण्यात आले होते. जागरुक शिवप्रेमींनी हा प्रकार पालिकेच्या अधिकाऱयांच्या आणि पदाधिकाऱयांच्या लक्षात आणून दिल्यानंतर तातडीने हे सर्व फलक काढून टाकण्यात आले. या प्रकाराबद्दल शिवप्रेमींनी राग व्यक्त केल्याचे लक्षात आल्यावर महापौर चंचला कोद्रे यांनी घडल्याप्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. या चुकीमध्ये पालिकेच्या अधिकाऱयांचा किंवा पदाधिकाऱयांचा काहीही दोष नसून, कंत्राटदाराने ही चूक केल्याचे कोद्रे यांनी स्पष्ट केले.