आवर्जून भेट द्यावी अशा पुण्यातील ठिकाणांच्या सहली आणि पुण्याच्या टेकडय़ांवरील निसर्ग पर्यटनापासून पुणेरी खादाडीपर्यंतचा शहराचा वारसा ‘पुणे हेरिटेज फेस्टिव्हल’मधून उलगडणार आहे.
५ ते ७ फेब्रुवारी व १२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान हा महोत्सव होणार असून त्यात विविध ५१ कार्यक्रमांचा समावेश आहे. ‘जनवाणी’ आणि ‘इंटॅक’ या संस्थांतर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जनवाणी संस्थेचे विश्वस्त रवी पंडित आणि इंटॅकचे निमंत्रक शार्वेय धोंगडे यांनी पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. ५१ पैकी ३४ कार्यक्रम सर्वासाठी विनामूल्य आहेत, तर काही कार्यक्रम सशुल्क आहेत.
फग्र्युसन महाविद्यालय, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय), चित्रपट व दूरचित्रवाणी संस्था (एफटीआयआय) या पुणेकरांच्या रोजच्या ओळखीतल्या संस्थांसह शेतकी महाविद्यालय, ‘भांडारकर ओरिएंटल रीसर्च इन्स्टिटय़ूट’, आयुर्वेद रसशाळा, ‘बोटॅनिकल सव्र्हे ऑफ इंडिया’, केंद्रीय मधुमक्षिका संशोधन व प्रशिक्षण संस्था, ‘टाटा अर्काइव्हज्’ या सहसा भेट न दिल्या जाणाऱ्या संस्था पाहण्याची संधी या महोत्सवाच्या निमित्ताने मिळणार आहे. पिंपरी-चिंचवडमधील ‘हेरिटेज वॉक’चाही त्यात समावेश आहे. वेताळ टेकडीवरील हिरवाई आणि तिथे सापडणारे विविध कीटक, मृत्युंजयेश्वर मंदिराच्या परिसरात दिसणारी वटवाघळे, घोले रस्त्यावरील विविध झाडे आणि मुळा-मुळा नद्यांच्या काठावरचे पक्षी या निसर्गवैभवाचे निरीक्षणही महोत्सवात करता येईल.
पुण्यातील वारसामूल्य असलेल्या सहा शिक्षणसंस्थांची सहल, मध्य पुण्यातील खवय्यांच्या पसंतीच्या ठिकाणांची सफर आणि राजा केळकर वस्तू संग्रहालयालयातील ‘ट्रेजर हंट’ असे सशुल्क कार्यक्रमही महोत्सवात आहेत. अधिक माहिती http://www.virasatpune.com या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे आयोजकांनी कळवले आहे.
मोडी आणि पर्शियन भाषांच्या ओळखीपासून
वैज्ञानिक खेळण्यांपर्यंत!
शिवशाही पत्रांचे वाचन, मोडी आणि पर्शियन भाषांची तसेच पाताळेश्वर लेण्यांमधील चित्रांची ओळख, ‘आयुका’मध्ये वैज्ञानिक खेळण्यांची प्रात्यक्षिके अशा विविध विषयांवरील व्याख्याने व कार्यशाळांसह विश्रामबाग वाडा परिसरात खुल्या वातावरणात रेखाचित्रे (स्केचिंग) काढणे, रांगोळी काढणे अशा प्रात्यक्षिकांचे कार्यक्रमही होणार आहेत. तर कलारसिकांना चतु:शृंगी मंदिर परिसरात ओडीसी व कथक नृत्याचे, तर कलाछाया सभागृहात लावणी नृत्याचे सादरीकरण पाहायला मिळेल.