* वाद्य उराशी बाळगणे ही मोठी जबाबदारी पेलण्याचे अभिवचन असल्याची जाणीव’

पुणे : व्हायोलिन या पाश्चात्य वाद्यातून हिंदुस्थानी संगीताचे गायकी अंगाचे सूर रसिकांना आनंद देतात याची प्रचिती रसिकांना वारंवार येते. हे व्हायोलिन तीनशे वर्षांचे असेल तर त्यातून निघणारे सूर रसिकांना परमानंद न देतील तरच नवल. ज्येष्ठ गुरू पं. डी. के. दातार यांच्या व्हायोलिनवर अवघ्या १८ वर्षांच्या यज्ञेशने सूर छेडत रसिकांच्या काळजात घर केले.

नुकत्याच संपलेल्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’त यज्ञेश रायकर याने वडील मिलिंद रायकर यांच्यासमवेत व्हायोलिन सहवादनाची मैफल रंगविली. मिलिंद रायकर यांचे गुरू पं. डी. के. दातार यांच्याकडून मिळालेले तीनशे वर्षांपूर्वीचे व्हायोलिन यज्ञेशने या मैफलीमध्ये वाजविले. या मैफलीला पं. दातार यांच्या पत्नी डॉ. सुधा दातार यज्ञेशला आशीर्वाद देण्यासाठी आवर्जून उपस्थित होत्या. या मैफलीत यज्ञेशच्या वादनाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून यज्ञेश याने वडिलांकडे व्हायोलिनवादनाचे धडे गिरवायला सुरुवात केली. बोरीवली येथे त्याने व्हायोलिनवादनाचा पहिला कार्यक्रम सादर केला, तेव्हा दातार यांच्या पत्नी डॉ. सुधा दातार त्याला आवर्जून उपस्थित होत्या. यज्ञेश याचे वादन ऐकून त्यांनी दातार यांचे व्हायोलिन भेट देत असल्याचे जाहीर केले. गुरू पं. दातार यांचे वाद्य त्यांनी माझ्याकडे सोपविले तो क्षण आणि सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या स्वरमंचावर पाऊल ठेवले तो, असे माझ्या छोटय़ाशा आयुष्यातील महत्त्वाचे क्षण आहेत. पन्नास वर्षांहून अधिक काळ दातार यांनी वादन केलेले हे वाद्य उराशी बाळगणे ही मोठी जबाबदारी पेलण्याचे अभिवचन असल्याची जाणीव झाली आहे, अशी भावना यज्ञेश रायकर याने व्यक्त केली.

पं. दातार यांनी या व्हायोलिनवर पंच्याहत्तर वर्षांहून अधिक काळ वादन केले होते. त्यांनी ज्यांच्याकडून हे व्हायोलिन घेतले त्या व्यक्तीने ते ८० वर्षे वापरले होते. या व्हायोलिनचे वय किमान तीनशे वर्षे आहे.

दातार गुरुजींच्या परवानगीने मीदेखील त्यांच्या व्हायोलिनवर वादन केले असून त्यातून फारच छान सूर छेडले जातात. अशा सुरांचा वारसा लाभलेला यज्ञेश हा खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे. दातार गुरुजींचे व्हायोलिन ही त्याच्यासाठी जगातील सर्वात मौल्यवान भेट आहे, असे मििलद रायकर यांनी सांगितले.