‘भाकरी-नोकरी-छोकरी’ हे ध्येय ठेवू नका, त्या पलीकडे जाऊन सर्वांगीण शिक्षणाचा विचार झाला पाहिजे, असे मत जळगाव येथील दीपस्तंभ फाउंडेशनचे अध्यक्ष यर्जुवेंद्र महाजन यांनी चिंचवडला व्यक्त केले. आजची शिक्षण पध्दती स्वत:ला ओळख निर्माण करून देण्यात अपयशी ठरल्याचे सांगत, ग्रामीण भागात हवी ती सौंदर्य प्रसाधने, नव्या चित्रपटांच्या सीडी मिळतात, मात्र पुस्तके उपलब्ध नसतात, या व्यवस्थेकडे त्यांनी लक्ष वेधले.
पिंपरी पालिका शिक्षण मंडळाने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या यर्जुवेंद्र महाजन, नामदेव माळी, हेरंब कुलकर्णी, गिरीश प्रभुणे, संदीप गुंड, दत्तात्रय सकट, जयश्री ढगे-शिंदे यांचा गौरव केला, तेव्हा सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. महापौर शकुंतला धराडे, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, सभापती चेतन घुले, उपसभापती नाना शिवले, अतिरिक्त आयुक्त तानाजी िशदे, भाऊसाहेब कारेकर, सीमा सावळे, आशा शेंडगे उपस्थित होते. या वेळी फत्तेचंद जैन विद्यालय, ज्ञानप्रबोधिनी, साई संस्कार संस्था, कामायनी, पताशीबाई रतनचंद मानव अंध शाळा आणि अपंग मित्र मंडळाची शाळा यांनाही गौरवण्यात आले.
महाजन म्हणाले,‘‘प्रत्येक शिक्षकाने आपल्या गावचं पालकत्व घेऊन ध्येयाने प्रेरित होऊन काम केले पाहिजे. आई व मुलाप्रमाणे विद्यार्थी व शिक्षकाचे प्रेमळ नाते असावे. अर्थप्राप्तीसाठी की अर्थपूर्णतेसाठी जगायचे, हे शिक्षकांनी ठरवले पाहिजे.’’ माळी म्हणाले,‘‘प्रत्येक शिक्षकाने लिहितं व्हायला हवं व मुलांना लिहायला प्रवृत्त करायला हवं.’’ कुलकर्णी म्हणाले की, शिक्षकांनी दैनंदिनी लिहावी, हा अनुभवरूपी ग्रंथ पुढच्या पिढीला द्यावा. संदीप गुंड म्हणाले,की ज्या विद्यार्थ्यांनी कधी रेल्वे, विमान पाहिले नाही, ते वाडय़ा-वस्त्यांवर टॅबद्वारे मंगळाच्या मोहिमेची माहिती घेतात. ग्रामीण भागातील नागरिकांनी जत्रा बंद करून सरकारी मदतीशिवाय उभ्या राहिलेल्या शिक्षणाच्या लोकचळवळीस आर्थिक हातभार लावला. दत्तात्रय सकट म्हणाले,‘‘मुलांच्या सर्जनशीलतेला संधी दिल्यास दगड खाणीवरील कामगाराचा मुलगा देखील जिल्हाधिकारी होऊ शकतो, हे सिध्द झाले आहे.’’ ढगे म्हणाल्या,की प्रत्येक शिक्षकामध्ये काहीतरी सर्वोत्तम असते, त्याला आपण चालना दिली पाहिजे. प्रास्ताविक कारेकर यांनी केले. श्रीकांत चौगुले व अविनाश वाळुंज यांनी सूत्रसंचालन केले. धनंजय भालेकर यांनी आभार मानले.