नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची अरबी समुद्रात प्रगती

पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘यास’ चक्रीवादळ बुधवारी ओडिशाच्या किनारपट्टीला धडकले असून, ओडिशासह पश्चिम बंगालमधील काही भागाला या चक्रीवादळाने मोठा तडाखा दिला. दरम्यान, चक्रीवादळामुळे पोषक स्थिती निर्माण झालेले नैर्ऋत्य मोसमी वारे आता अरबी समुद्रात सक्रिय झाले असून, त्यांनी निम्मा श्रीलंकाही व्यापला आहे. पुढील ४८ तासांत त्यांची आणखी प्रगती होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

बंगालच्या उपसागरात २४ मे रोजी निर्माण झालेले यास चक्रीवादळ ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला धडकण्याचा सुरुवातीला अंदाज होता. समुद्रातून उत्तर-पश्चिाम दिशेने पुढे जात हे चक्रीवादळ बुधवारी ओडिशाच्या किनारपट्टीला धडकले. त्या वेळी वाऱ्याचा वेग ताशी १३० ते १४० किलोमीटरच्या दरम्यान होता. त्यामुळे किनारपट्टीला मोठा तडाखा बसला. पश्चिम बंगालच्या किनारपट्टीपासून हे चक्रीवादळ जवळ असल्याने या भागातील किनारपट्टीवरही काही प्रमाणात तडाखा बसला. ओडिशातच काही भागात अतिवृष्टी झाली. जमिनीवर उतरल्यानंतर चक्रीवादळीची तीव्रता कमी झाली. रात्री त्याचे कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झाले असले, तरी ओडिसा, पश्चिम बंगालसह झारखंड, उत्तर प्रदेश आदी भागातही त्याचा परिणाम दिसून आला. ओडिशात ५.८ लाख लोकांना दुसरीकडे हलवण्यात आले असून पश्चिम बंगालमध्ये १५ लाख लोकांना हलवले आहे. आतापर्यंत तरी हानीचे कुठलेही वृत्त नाही. या भागात गुरुवारीही पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

‘यास’ चक्रीवादळामुळे चालना मिळालेल्या मोसमी वाऱ्यांनी सध्या निम्मा श्रीलंका व्यापला आहे. मालदीव आणि कोमोरीन या भागात ते दाखल झाले आहेत. त्यामुळे या भागात सध्या ढगांची निर्मिती झाली असून, काही भागात पाऊसही होत आहे. अरबी समुद्रातील त्यांची प्रगती नियोजित वेळेनुसार होत असल्याचे दिसून येत आहे. पुढील ४८ तासांच्या कालावधीत मोसमी वारे आणखी प्रगती करणार असून, ३१ मेपर्यंत ते केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

कोलकात्यातील सर्व उड्डाणपूल बंद
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले, की वादळाने त्यांच्या राज्यातील बऱ्याच भागाला तडाखा बसला असून पूर्व मेदिनीपूर, दक्षिण २४ परगणा, उत्तर २४ परगणा, पश्चिम मेदिनीपूर, हावडा, हुगळी, पुरुलिया, नैदा येथील लोकांना घरातच थांबण्याचे आवाहन त्यांनी केले. संपूर्ण रात्र सचिवालयात बसून बॅनर्जी यांनी परिस्थितीवर देखरेख केली. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कोलाकात्यातील सर्व उड्डाणपूल बंद करण्यात आले आहेत.