19 October 2019

News Flash

यासिन भटकळची सुनावणी ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे

जर्मन बेकरी बाँब स्फोट खटल्याची सुनावणी शिवाजीनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरू आहे.

यासिन भटकळ

जर्मन बेकरी स्फोट प्रकरण

पुणे : जर्मन बेकरी स्फोट प्रकरणातील सुनावणीसाठी या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार यासिन भटकळ याची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. तसे आदेश विशेष न्यायाधीश आर. एम. पांडे यांनी सोमवारी दिले.

इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या भटकळने साथीदारांबरोबर कट रचून देशभरात बाँबस्फोट घडविले. जर्मन बेकरी बाँब स्फोट खटल्याची सुनावणी शिवाजीनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरू आहे. भटकळ दिल्लीत आहे. सुरक्षेच्या कारणामुळे त्याला प्रत्यक्ष न्यायालयात हजर करता येणार नाही, असा अर्ज दिल्लीतील अधिकाऱ्यांनी न्यायालयात सादर केला होता. भटकळ याला सुनावणीसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुविधेद्वारे न्यायालयात हजर करणे योग्य ठरेल, असे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. राजा ठाकरे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. सुनावणीसाठी भटकळला प्रत्यक्ष न्यायालयात हजर  करावे, अशी विनंती त्याचे वकील अ‍ॅड. जहीरखान पठाण यांनी विशेष न्यायालयाक डे केली होती.

विशेष न्यायाधीश पांडे यांनी भटकळच्या वकिलांची विनंती अमान्य करून त्याला सुनावणीसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करणे योग्य ठरेल, असे स्पष्ट केले. १३ फेब्रुवारी २०१० रोजी कोरेगाव पार्क भागातील जर्मन बेकरीत झालेल्या बाँबस्फोटात १७ नागरिक मृत्युमुखी पडले होते. स्फोटात ५६ जण जखमी झाले होते. मृतांमध्ये पाच परदेशी नागरिकांचा समावेश होता. २९ एप्रिल २०१९ रोजी भटकळविरोधात जर्मन  बेकरी बाँबस्फोट प्रकरणात दोषारोप निश्चित करण्यात आले होते. त्यावेळी दिल्ली पोलिसांनी भटकळला पुढील सुनावणीसाठी प्रत्यक्ष हजर करता येणार नाही. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याला हजर करणे योग्य ठरेल, असा अर्ज विशेष न्यायालयात सादर केला होता.

First Published on September 17, 2019 12:55 am

Web Title: yasin bhatkal hearing through video conferencing zws 70