नाशिकमधील शेतक ऱ्याचा प्रयोग; ६०० किलो फ्लॉवर विक्रीस

पुणे : कृषी क्षेत्रात नवनवीन संशोधन आणि वाण विकसित करण्याचे प्रयोग सुरू असतात. नाशिकमधील शेतकरी महेंद्र निकम यांनी पिवळ्या आणि जांभळ्या रंगाच्या फ्लॉवरची लागवड केली आहे. आकर्षक रंगसंगती असलेले फ्लॉवर शुक्रवारी मार्केट यार्डातील फळभाजी बाजारात विक्रीस पाठविण्यात आला. या फ्लॉवरने किरकोळ व्यापाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आणि फ्लॉवरची विक्रीही लगोलग झाली.

फ्लॉवर म्हटले, की पांढरा रंग हे समीकरण सामान्यांच्या मनात असते. नाशिकमधील मालेगाव तालुक्यात असलेल्या दाभाडी गावातील शेतकरी महेंद्र निकम यांनी पिवळ्या आणि जांभळ्या रंगाच्या फ्लॉवरची लागवड केली आहे. मात्र, पिवळा आणि जांभळ्या रंगाचा फ्लॉवर बाजारात विक्रीस कसा पाठवायचा, असा प्रश्न त्यांच्यापुढे होता. बारामतीतील कृषी प्रदर्शनात त्यांनी पिवळ्या आणि जांभळ्या रंगाचा फ्लॉवर मांडला होता. मात्र, फ्लॉवरला बाजारपेठ मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांनी पणन संचालक सुनील पवार यांच्याशी संपर्क साधला.

नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतक ऱ्यांना शेतीमाल विकण्यासाठी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील अडते फळव्यापारी रोहन उरसळ आणि भाजीपाला व्यापारी सचिन पायगुडे नेहमी प्रयत्नशील असतात. उरसळ आणि पायगुडे यांनी निकम यांच्याशी संपर्क साधून आकर्षक रंगसंगती असलेला फ्लॉवर मार्केट यार्डात विक्रीस पाठविण्यास सांगितले. पायगुडे यांच्या गाळ्यावर शुक्रवारी सहाशे किलो पिवळा व जांभळ्या रंगाचा फ्लॉवर विक्रीस पाठविण्यात आला. साठ रुपये किलो दराने फ्लॉवरची विक्री झाली. किरकोळ व्यापाऱ्यांकडून चांगली मागणी राहिली, असे पायगुडे आणि उरसळ यांनी सांगितले.

कृषिक्षेत्रातील एका बहुराष्ट्रीय कंपनीने पिवळ्या आणि जांभळ्या रंगाच्या फ्लॉवरचे वाण विकसित केले आहे. या कंपनीकडून परदेशात काही कृषीविषयक प्रकल्प करण्यात येत आहेत. या कंपनीच्या प्रतिनिधींबरोबर मी संपर्क साधला. भारतात पहिल्यांदाच पिवळ्या आणि  जांभळ्या रंगाच्या फ्लॉवरची लागवड केली. तीस गुंठे क्षेत्रावर फ्लॉवरची लागवड करण्यात आली आहे. दररोज दोन टन उत्पादन निघते. मुंबई, पुणे, नाशिक येथील बाजारात फ्लॉवर विक्रीस पाठविण्यास सुरुवात केली आहे. पांढऱ्या फ्लॉवरच्या तुलनेत या फ्लॉवरमध्ये जीवनसत्त्व विपुल प्रमाणावर आहेत.

– महेंद्र निकम, शेतकरी, दाभाडी, ता. मालेगाव, जि. नाशिक