येरवडा कारागृहातील पेपर विभागात लागणारे ‘मोल्ड मशिन’ खरेदीसाठी सव्वा बारा लाख रुपये घेऊन बनावट मशिन दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत विनायक पांडुरंग जोशी (वय ५५, रा. महाराष्ट्र हौसिंग सोसायटी, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून मनोज कटारिया (रा. ३८३/बी,  शनिवार पेठ) याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा मध्यवर्ती कारागृहातील पेपर विभागात डोंबिवली येथील मे. सिटसन इंडिया प्रा. लि.या कंपनीनेचे सव्वा बारा लाख रुपयांची मोल्ड मशिन खरेदी करण्याचे ठरविले. त्यासाठी कारागृहाने आरोपीस हे मशिन देण्यास सांगितले. त्यासाठी सव्वा बारा लाख रुपये ही मशिनची पूर्ण रक्कम कटारियाला दिली. मात्र, त्याने कारागृहास अन्य सुट्टय़ा भागांची जोडणी करून बनविलेले मशिन दिले. ते मशिन खराब झाल्यानंतर ही बाब लक्षात आली त्यानंतर त्यांनी कटारियाला मे. सिटसन इंडिया कंपनीचेच मशिन देण्यास सांगितले असता त्याने नकार दिला. या प्रकरणी फसवणूक केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सनदी हे अधिक तपास करत आहेत.