येरवडा कारागृहात ‘वायसीपी रेडिओ’ नावाने रेडिओ केंद्र सुरू करण्यात आले आहे. हे केंद्र चालविणारे आणि त्यावरील रेडिओ जॉकी हे कैदीच असणार आहेत. येरवडय़ातील रेडिओचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर राज्यातील सर्व कारागृहात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या प्रयोगामुळे येरवडा कारागृहातील कैद्यांना आता दुपारी एक तास संगीत ऐकण्यास मिळणार असून, कारागृहात रेडिओ सुरू करणारे येरवडा हे राज्यातील पहिले मध्यवर्ती कारागृह ठरले आहे.
राज्याच्या कारागृह विभागाच्या प्रमुख मीरा बोरवणकर यांनी ही माहिती दिली. येरवडा कारागृह हे राज्यातील सर्वात मोठे मध्यवर्ती कारागृह आहे. या ठिकाणी कच्चे कैदी आणि शिक्षा भोगत असलेले मिळून साडेतीन हजार कैदी आहेत. या कैद्यांना काम असले तरी, बराकीत टीव्ही असला तरी मनोरंजनाची सोय असावी म्हणून त्यांच्यासाठी रेडिओ सुरू करण्याचा विचार कारागृह अधीक्षक योगेश देसाई यांच्या मनात आला. त्यानुसार त्यांनी ही संकल्पना बोरवणकर यांच्या कानावर घातली. त्यांनी या संकल्पनेस मान्यता दिली. या रेडिओचे उद्घाटन मंगळवारी सुप्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्या हस्ते करण्यात आले. येरवडा सेंट्रल प्रीझन रेडिओ म्हणजे ‘वायसीपी रेडिओ’ या नावाने हे केंद्र आहे.
याबाबत येरवडा कारागृहाचे अधीक्षक योगेश देसाई म्हणाले की, गेल्या काही महिन्यांपासून कारागृहात रेडिओचा स्टुडिओ उभारून त्याचे प्रयोग सुरू आहेत. दुपारी बारा ते एक या दरम्यान सर्व कामकाज बंद असते. सर्व कैदी त्यांच्या बराकीमध्ये असतात. यावेळी त्यांना एक तासभर मनोरंजनाचे कार्यक्रम, भजन, विनोदी किस्से, संगीत ऐकविले जाणार आहे. हे रेडिओ केंद्र चालविणारे रेडिओ जॉकी हे कैदीच असणार आहेत. यातील काही कैदीच स्क्रीप्ट तयार करणार आहेत. यामध्ये पहिले प्रेम, भावाचे नाते, आई अशा विविध विषयांवर स्क्रीप्ट करून तो कार्यक्रम कैद्यांना ऐकविला जाईल. यामध्ये संगीत ऐकविले जाईल. त्याबरोबर कैद्यांना कायदेशीर माहिती, प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती, कैद्यांचे प्रश्न पत्राद्वारे मागून नाव न घेता ते सोडविले जातील. सध्या मराठी, हिंदी भाषेत हा एक तास कार्यक्रम चालणार आहे.
‘रेडिओ जॉकीसाठी कैद्यांची ऑडिशन’
कारागृहात वायसीपी रेडिओ केंद्र सुरू करण्याचे ठरल्यानंतर कारागृहातील कैद्यांना ऑडिशनसाठी बोलाविण्यात आले. त्याला अनेक कैदी आले होते. त्यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये ऑडिशन दिली. यामधूनच आम्ही काही कैद्यांची रेडिओ जॉकी म्हणून निवड केली आहे. स्क्रीप्टसाठी काही कैदी निवडले आहेत, असे देसाई यांनी सांगितले.

BSNL, 4G, 5G, services, Central Government
बीएसएनएलला अजूनही ४ जी, ५ जीची प्रतीक्षा! केंद्र सरकारकडून दिरंगाई
HC orders Mumbai Municipal Corporation to devise alternative policy for unlicensed hawkers
विनापरवाना फेरीवाल्यांसाठी पर्यायी धोरण आखा, उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेला आदेश
drug-resistant tuberculosis
औषध प्रतिरोध क्षयरोग नियंत्रणात, क्षय बरा होण्याचा दर २०२३ मध्ये ८२ टक्के
Seawoods construction blast
सीवूड्समध्ये बांधकाम प्रकल्पातील नियंत्रित स्फोट बंद करण्याची पालिकेची सूचना, अन्यत्र ठिकाणी मात्र दुर्लक्ष