अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांचे  पिंपरी पालिकेला आश्वासन

पिंपरी : आर्थिक संकटात सापडलेल्या येस बँकेत अडकलेले पिंपरी महापालिकेचे ९८४ कोटी २६ लाख रुपये परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या दोन दिवसांत हे पैसे पालिकेला मिळू शकतील, अशी ग्वाही केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिल्याची माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.

खासदार बारणे यांनी दिल्लीत अनुराग ठाकूर यांची भेट घेतली. पिंपरी पालिकेच्या ठेवी आणि त्यावरील व्याज असे मिळून ९८४ कोटी रुपये बँकेत अडकले असल्याची माहिती त्यांनी ठाकूर यांना दिली. त्यानंतरच्या चर्चेत दोन दिवसांत हे पैसे पालिकेला मिळतील, अशी ग्वाही ठाकूर यांनी दिल्याचे बारणे यांनी सांगितले. रिझव्‍‌र्ह बँकेकडून ५ मार्चला येस बँकेवर कठोर निर्बंध घालण्यात आले. या घडामोडींमुळे पिंपरी पालिकेत चिंतेचे वातावरण होते.

२०१८ मधील ठेवी

ऑगस्ट २०१८ मध्ये पालिकेने बँकेत एक हजार कोटींच्या ठेवी ठेवल्या. तेथून कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी बँक ऑफ बडोदाला पैसे वळते केले जात होते. पालिकेच्या ठेवी आणि त्यावरील व्याज मिळून मोठी रक्कम बँकेत अडकली होती. ती रक्कम पालिकेला मिळू शकेल, अशी आशा निर्माण झाली आहे.