रेल्वेच्या अंदाजपत्रकात जाहीर करण्यात आलेली यशवंतपूर (बंगळुरु)- चंदीगड ही पुणे मार्गे जाणारी संपर्क क्रांती एक्स्प्रेस शनिवारी सुरू करण्यात आली. त्याचप्रमाणे चंदीगड- यशवंतपूर या मार्गावरही गाडी सुरू करण्यात आली आहे.
दोन्ही मार्गांवर आठवडय़ातून दोनवेळा गाडी सोडण्यात येणार आहे. यशवंतपूर- चंदीगड ही गाडी प्रत्येक शनिवार व बुधवारी दुपारी सव्वाएक वाजता यशवंतपूरहून सुटेल. ती पुण्यात दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार व गुरुवारी सकाळी पावणेनऊ वाजता येईल. सोमवारी व शुक्रवारी संध्याकाळी ५.२० वाजता ती चंदीगडला पोहोचेल. चंदीगड- यशवंतपूर ही गाडी प्रत्येक मंगळवार व शनिवारी पहाटे सव्वातीनला चंदीगडहून सुटेल. ती पुण्यात बुधवारी व रविवारी सकाळी ११.०५ वाजता येईल. गुरुवार व सोमवारी सकाळी ६.२० वाजता ती यशवंतपूरला पोहोचेल. तुमकूर, दावणगिरे, हुबळी, धारवाड, बेळगाव, मिरज, पुणे, भोपाळ, हजरत निजामुद्दीन, नवी दिल्ली, पानिपत, अंबाला कॅन्टोन्मेंट या स्थानकावर ही गाडी थांबेल.
यशवंतपूर- चंदीगड या गाडीला पुढे कालकापर्यंत वाढवावे. त्याचा पर्यटकांनाही उपयोग होईल. सिमला, कुलू, मनाली आदीसाठी कालकापर्यंत गाडी झाल्यास उत्पन्नातही वाढ होईल. त्याचप्रमाणे गी गाडी रोज सोडण्यात यावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या हर्षां शहा यांनी केली.