मोटार बाईकच्या दुनियेत रोज नवनवीन मॉडेल्सची भर पडत असताना बाईकच्या जुन्या मॉडेल्सवर प्रेम करणारी तरुणाई आजही आवर्जून पहायला मिळते. युवकांच्या मनावर भुरळ घालणाऱ्या परंतु आता उत्पादन बंद झाल्याने हळूहळू रस्त्यांवरून नामशेष होत गेलेल्या यझदी जावा बाईकचेही असेच काहीसे झाले आहे. मात्र काही युवक-युवतींनी हौसेने या बाईकचे जतन केले आहे. िव्हटेज बाईकचा दर्जा प्राप्त झालेल्या या बाईकची नव्या पिढीलाही माहिती व्हावी, या एकाच उद्देशाने हौशी मंडळी एकत्र आली असून या हौशी युवकांचे पहिलेच दोन दिवसीय शिबिर भीमाशंकर येथे उत्साहात पार पडले.
यझदी जावा क्लबच्या पुढाकाराने भीमाशंकर येथे आयोजित या शिबिरात १५ महिला रायडर्ससह ज्यांच्याकडे यझदी जावा आहे असे १७८ जण सहभागी झाले होते. त्यात पुण्यातील ७२ जणांसह सातारा, फलटण, कराड, नाशिक आणि औरंगाबादमधील रायडर्सचा समावेश होता. काही वर्षांपूर्वी यझदी बाईकवर जगभर प्रवास करणाऱ्या आणि विविध विक्रमांची नोंद केलेल्या मुंबईतील पंचाहत्तर वर्षीय प्रवीण कारखानीस आणि रायिडगमध्ये अनेक विक्रम प्रस्थापित करणाऱ्या दीपक कामत यांच्या हस्ते या अनोख्या शिबिराचे उदघाटन करण्यात आले. कारखानीस आणि कामत यांनी यावेळी शिबिरार्थीना रायिडगचे अनुभव सांगितले आणि रायडिंगबाबत मार्गदर्शनही केले. यझदी आणि जावा कंपनीने या बाईकचे उत्पादन केव्हाच थांबविले आहे. सुटय़ा भागांचे उत्पादनही बंद झाले आहे. अशा परिस्थितीत अगदी साठ-पासष्ट वर्षांपूर्वीच्या जुन्या बाईक चालू स्थितीत ठेवण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न करणाऱ्या, प्रसंगी आवश्यक असलेले काही सुटे भाग स्वत: तयार करून घेणाऱ्या हौशी बाईक रायडर्सच्या हौसेचे कौतुकही कारखानीस यांनी यावेळी केले.
या दोन दिवसीय शिबिरामध्ये यझदी जावा या बाईकचे जतन करण्यासाठी काय करता येईल, ही चळवळ कशी पुढे नेता येईल, दुरुस्ती व सुटे भाग उपलब्धतेबाबत एकमेकांना सहकार्य करण्याबरोबरच इतर विषयांवरही चर्चा झाली. काही दिवसांत देशभरातील यझदी जावा मालकांचे शिबिर घ्यावे असाही निर्णय यावेळी घेण्यात आला. पुण्यातील यजदी जावा बाईकच्या तीन तंत्रज्ञांनी यावेळी देखभाल-दुरुस्तीबाबत मार्गदर्शन केले. या निमित्ताने स्लो रायिडग, टोईंग रेस अशा स्पर्धाचेही आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती यझदी जावा ओनर्स क्लबचे मंदार फडके यांनी दिली.