अजित पवार यांचा राजकीय बालेकिल्ला असलेल्या पिंपरीतील तीनही मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव झाल्याचे तीव्र पडसाद पक्षात उमटले. महापालिकेत स्पष्ट बहुमत असतानाही झालेल्या या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून शहराध्यक्ष योगेश बहल यांनी सोमवारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे पदाचा राजीनामा पाठवला. गटबाजीच्या राजकारणामुळे वैतागलेल्या बहल यांनी यापूर्वीच शहराध्यक्षपद सोडण्याची विनंती अजितदादांना केली होती. तथापि, निवडणुका होईपर्यंत थांबण्याची सूचना त्यांनी केल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे राजीनामा आताच देण्याचे खरे कारण काय, याविषयी उलट-सुलट तर्क आहेत.
पिंपरीत राष्ट्रवादीचे प्राबल्य असून महापालिकेत निर्विवाद बहुमत आहे. मात्र, तरीही भोसरी विधानसभेत राष्ट्रवादीचे आमदार विलास लांडे यांचा बंडखोर महेश लांडगे यांच्याकडून तर पिंपरीतील आमदार अण्णा बनसोडे यांचा शिवसेनेच्या गौतम चाबुकस्वार यांच्याकडून पराभव झाला. चिंचवडला राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांचा भाजपचे लक्ष्मण जगताप यांच्याकडून दारुण पराभव झाला. बालेकिल्ल्यातच तीनही उमेदवारांचा अशाप्रकारे पराभव झाल्याने राष्ट्रवादीचा बालेकिल्लाच ढासळल्याचे चित्र पुढे आले. या संदर्भात, अजितदादांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यापूर्वीच बहल यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून तटकरे यांच्याकडे राजीनामा पाठवला. वास्तविक, शहराध्यक्ष झाल्यापासून त्यांनी जे अनुभव घेतले, ते पाहता शहराध्यक्षपदावर कायम राहण्यास ते फारसे उत्सुक नव्हते. नगरसेवक, पदाधिकारी तसेच अन्य नेत्यांकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. नगरसेवक बैठकांना उपस्थित राहात नव्हते. स्वत:च्या व्यस्त वेळापत्रकातून पक्षासाठी वेळ काढणे त्यांना जमत नव्हते. स्थानिक वर्गाकडून त्यांचे नेतृत्व मान्य केले जात नव्हते. अशा कारणांमुळे त्यांना पदात स्वारस्थ्य राहिले नव्हते. मात्र, दुसरे सक्षम नाव पुढे येत नसल्याने बहल यांनाच पदावर ठेवण्याची भूमिका अजितदादांनी घेतली होती. विलास लांडे व अण्णा बनसोडे यांच्याशी बहल यांचे तीव्र मतभेद होते. बहल यांचे समर्थक विरोधात काम करत असल्याची तक्रारही हे उमेदवार करत होते. अशा परिस्थितीत त्यांच्याच पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून बहलांनी तत्परतेने राजीनामा दिला आहे.