पिंपरी चिंचवड भागातील पिंपळे गुरव भागात गणपती विसर्जन करताना एका तरूणाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सृष्टी चौक गणेश विसर्जन घाटावर ही घटना घडली आहे. शिवाजी चंदर शिंदे असे बुडालेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी गणपती विसर्जन करताना शिवाजी शिंदे या तरूणाचा पवना नदीत बुडून मृत्यू झाला.

पिंपळे गुरव भागातील वैद्य वस्तीत शिवाजी वास्तव्यास होता. पवना नदीच्या काठी असलेल्या सृष्टी चौक घाटावर तो गणपती विसर्जन करत होता, एका गणेश भक्ताने त्याला मध्यभागी जाऊन गणपतीचे विसर्जन कर असे सांगितले, त्याप्रमाणे तो नदीच्या मध्यभागी गेला पण तिथे पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला असल्याची माहिती समोर आली आहे. शिवाजीला पोहता येत नव्हते त्यामुळे तो बुडाला अशी माहिती अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

शिवाजी शिंदे हा बुडाल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्नीशमन दलाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले, सृष्टी चौक घाट हा अधिकृत गणेश विसर्जन घाट नाही. तरीही तिथे लोक गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करत होते, अनेक गणेशभक्तांना हा विसर्जन घाट जवळ पडतो म्हणून याच ठिकाणी विसर्जन केले जात होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. शिवाजी शिंदे या तरूणाचा मृतदेह सापडला नसून अग्निशमन दलाच्या जवानांकडून शोधकार्य सुरू आहे अशीही माहिती समोर आली आहे.