‘हिंदूी चित्रपटात काम करणे गेल्या काही वर्षांपासून बंद केले आहे. हिंदूीमध्ये मी खलनायकाच्या भूमिका करतो. वाढत्या वयानुसार मारामाऱ्या आणि धावपळ जमणारी नाही. शंका आली की तेथून बाजूला होणे महत्त्वाचे वाटते. आपणच ‘एक्झिट’ची वेळ ओळखली पाहिजे..’ ही भावना आहे प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी यांची. हिंदूीमध्ये काम करणे थांबवले असले तरी मराठी चित्रपट आणि नाटकातून भूमिका करणे सुरूच ठेवणार असून झेपेल एवढे काम करून भविष्यामध्ये सामाजिक कामाला प्राधान्य देणार असल्याचेही मोहन जोशी यांनी स्पष्ट केले.
वयाच्या सहाव्या वर्षांपासून ते एकसष्टीपर्यंतचा जीवनप्रवास शब्दबद्ध करणारे मोहन जोशी यांचे ‘नटखट नट-खट’ या आत्मकथनपर पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (२८ डिसेंबर) ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, डॉ. वि. भा. देशपांडे, माधव वझे, भारत सासणे, अशोक कोठावळे, डॉ. माधवी वैद्य, मंगेश तेंडुलकर यांच्यासह नीना कुळकर्णी, भरत जाधव, मुक्ता बर्वे, अॅड. नंदू फडके, सुनील महाजन, अशोक शिंदे, सविता मालपेकर, ज्योती चांदेकर, दीपक करंजीकर आणि भाऊसाहेब भोईर यांचा सहभाग आहे. हे औचित्य साधून मोहन जोशी यांनी सोमवारी संवाद साधला. जयंत बेंद्रे यांनी या पुस्तकाचे शब्दांकन केले आहे.
आत्मचरित्र लिहायचे मनात नव्हते. तसा कधी विचारही केला नाही. रसिकांनी नाव, पैसा आणि प्रसिद्धी दिली त्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि आयुष्यात बऱ्यापैकी चढ-उतार आले त्याविषयी काही मांडावे ही भूमिका होती. माझी वाटचाल तरुण कलाकारांना मार्गदर्शक ठरावी हाही एक उद्देश असल्याचे मोहन जोशी यांनी सांगितले. माझा स्वभाव आणि वागणूक लक्षात घेता पुस्तकाच्या शीर्षकामध्ये नट आणि खट या दोन शब्दांमध्ये आडवी रेघ असावी असे एकाने सुचविले. मी कसा चांगला आहे आणि मी कसा वाईट आहे हे तटस्थपणाने मांडलेले आहे. एखादी चांगली संहिता मिळाली तर नाटक किंवा चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची इच्छा आहे, असेही मोहन जोशी यांनी सांगितले.
नेतृत्व करायचे तेव्हा वाद होणे सहजशक्य आहे. मला जे वाटते तेच दुसऱ्याला वाटेल असे नाही. त्यामुळे वाद होतात. ते चांगले लक्षण आहे. वाद व्हायलाच हवेत. वाद विरोधी पक्षासारखे असतात. तो असेल तरच तुम्हाला मार्गदर्शनही करू शकतो आणि तुमच्यावर अंकुशही ठेवतो, ही भूमिका स्पष्ट करून मोहन जोशी यांनी या पुस्तकामध्ये नाटय़ परिषदेच्या कालखंडातील वादांसंदर्भातही लेखन असल्याचे सांगितले.