सृजनात्मक कामासाठी अभ्यासवृत्तीची योजना

नाटय़, दृश्यकला, संगीत, नृत्य अशा विविध प्रयोगकलांमध्ये धडपडणाऱ्या युवा कलाकारांना त्यांची वाटचाल सुकर व्हावी या उद्देशातून ‘रंगसेतू अभ्यासवृत्ती’चा आधार लाभणार आहे. दोन दिवसांच्या कार्यशाळेच्या चाचणीतून निवड झालेल्या पाच कलाकारांना सृजनात्मक कामासाठी दरमहा दहा हजार या स्वरूपाची अभ्यासवृत्ती दिली जाणार आहे.

महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फे हा अभिनव आणि महत्त्वपूर्ण प्रकल्प राबविण्यात येणार आहे. ‘रंग’ ही संकल्पना भरतमुनींच्या नाटय़शास्त्रापासून ते प्रयोगकलांच्या संदर्भात वापरली गेली असून दृश्यकलेमघ्येही हा घटक महत्त्वाचा आहे. तर, ‘सेतू’ म्हणजे दोन तीर जोडणारा. पूर्वअनुभव किंवा कलाशिक्षण, सृजनात्मक काम आणि प्रत्यक्ष व्यवसाय यांचा दुवा साधणारी ही अभ्यासवृत्ती असल्याने तिचे ‘रंगसेतू’ असे नामकरण करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे प्रमोद काळे यांनी शुक्रवारी दिली. विनोद दोशी फाउंडेशनतर्फे केवळ रंगभूमी क्षेत्रातील युवा रंगकर्मीना दुबे-तेंडुलकर अभ्यासवृत्ती दिली जाते. मात्र, रंगसेतू अभ्यासवृत्तीमध्ये सर्व प्रयोगकलांचा समावेश करण्यात आला आहे.

नाटय़ (लेखन, दिग्दर्शन, अभिनय), दृश्यकला (चित्र, शिल्प, इन्स्टॉलेशन), संगीत (गायन-वादन, संगीत रचना), नृत्य (सर्व भारतीय अभिजात नृत्यशैली आणि प्रायोगिक नृत्यप्रकार) या प्रयोगकलांसाठी राज्यभरातून २२ ते ३५ वयोगटातील युवा कलाकारांकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत. प्रत्येक कला क्षेत्रातील पाच याप्रमाणे वीस जणांची निवड करून त्यांची मुलाखत घेतली जाणार आहे. डॉ. चैतन्य कुंटे, परिमल फडके, अश्विनी गिरी, डॉ. नितीन हडप या चार तज्ज्ञ समन्वयकांची दोन दिवसांची कार्यशाळा होणार असून त्यातून अंतिम पाच जणांची निवड केली जाणार आहे. अभ्यासवृत्ती मिळाल्यानंतर त्या कलाकाराने दर तीन महिन्यांनी आपण केलेल्या कामाचा वृत्तान्त पाठविणे आवश्यक आहे. अभ्यासवृत्तीसाठी रंगसेतू अभ्यासवृत्ती, महाराष्ट्र कल्चरल सेंटर, द्वारा सुदर्शन रंगमंच, ४२१ शनिवार पेठ, पुणे ४११०३० (दूरध्वनी क्र. ०२०-२४४३०८०३ या पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.