उत्तर प्रदेशातील डॉक्टरची फसवणूक
पिंपरीतील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने उत्तर प्रदेशातील एका डॉक्टर तरुणाला साठ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पिता-पुत्रासह तिघांविरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
अभिजित बोत्रे, रोहिदास बोत्रे (दोघे रा. रजत अपार्टमेंट, लिंक रस्ता, चिंचवड, सध्या रा. विस्डम पार्क, पिंपरी) आणि आदित्य घाटणेकर (रा. रोहन हाईट्स, संत तुकारामनगर, पिंपरी) अशी गुन्हा दाखल केलेल्या भामटय़ांची नावे आहेत. डॉ. पीयूष सिंग (वय २८, मूळ रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. पिंपरी) यांनी या संदर्भात िपपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आदित्य घाटणेकर हा डॉ. सिंग याचा परिचित आहे. तर रोहिदास बोत्रे हा व्यावसायिक आहे. सिंग याचे शिक्षण एमबीबीएसपर्यंत झाले असून, त्याला एम. एस. ऑथरेपेडिक्स या पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घ्यायचा होता. घाटणेकर याने बोत्रे याच्यामार्फ त प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न कर, असे सिंग याला गेल्या वर्षी सांगितले होते.
घाटणेकर आणि बोत्रे याने त्याला पिंपरीतील डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. त्यानंतर तिघाजणांनी डॉ. सिंग यांच्याकडून गेल्या वर्षभरात वेळोवेळी पैसे उकळले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गजानन कडाळे तपास करत आहेत.

तक्रार करण्याचे आवाहन
बोत्रे आणि घाटणेकर याने डॉ. सिंग यांच्यासह आणखी कोणाची फसवणूक केली का, यादृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे. दरम्यान, प्रवेशाच्या आमिषाने आरोपी बोत्रे आणि घाटणेकर यांनी फसवणूक केल्यास त्वरित पोलिसांकडे तक्रार करा, असे आवाहन परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांनी केले आहे.