विकृत मनोवृत्तीचा तरूण गजाआड

तळेगाव दाभाडे परिसरात सदुंबरे गावात तेरा दिवसांपूर्वी झालेल्या शाळकरी मुलीच्या खुनाचे गूढ उकलण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने विकृत मनोवृत्तीच्या तरुणाला गजाआड केले.

महेंद्र उर्फ  कुमार दत्तू तळपे (वय २४, रा. वशिरे, तळपे वस्ती, ता. खेड) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. एकवीस मे रोजी पायल संतोष जगताप (वय ७, रा. लोणीकाळभोर) आणि तिची मावसबहीण ॠतुजा काळुराम कुसुमकर (वय १४) यांच्यावर सदुंबरे गावातील ओढय़ानजीक तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले होते. यामध्ये पायल आणि ॠतुजा या गंभीर जखमी झाल्या होत्या. उपचारादरम्यान पायल हिचा तळेगाव दाभाडे येथील रुग्णालयात मृत्यू झाला होता. हल्ल्यामागचे कारण समजले नसल्यामुळे पोलीस चक्रावून गेले होते. ग्रामीण पोलिसांनी खूनप्रकरणाचा तपास सुरू केला. तपासात आरोपी तळपे हा गावातील एका मुलीचा पाठलाग करून तिला त्रास देत होता. याबाबतची माहिती ॠतुजाला होती. त्यामुळे तो तिच्यावर चिडला होता. आरोपी तळपे याने यापूर्वी गावातील काही मुलींना त्रास दिला होता.

दरम्यान रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ॠतुजाची पोलिसांनी चौकशी केली. तळपे याने या दोघींवर हल्ला केल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. त्याआधारे पोलिसांनी तळपे याचा शोध सुरू केला. तो एका केटरिंग व्यावसायिकाकडे काम करत होता. गेल्या काही दिवसांपासून तळपे कामावर आला नसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला नवी मुंबईत पकडले. तळपे हा विकृत मनोवृत्तीचा आहे. काही वर्षांंपूर्वी त्याने रागाच्या भरात स्वत: चे घर पेटविले होते. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राम जाधव, सहाय्यक निरीक्षक सतीश होडगर, विजय पाटील, राजेंद्र मिरघे, सुनील जावळे, शंकर जम, दत्ता बनसुडे, गणेश महाडिक, विशाल साळुंके, चंद्रकांत बागेवाडी यांनी ही कारवाई केली.