युवा संशोधक अम्रिता हाजरा यांची भूमिका

पुणे : परंपरेमध्ये असते तसे सामथ्र्य विज्ञानामध्येही असते. पण, या दोन्हीसंदर्भात टोकाची भूमिका घेणे योग्य होणार नाही. परंपरेला आणि विज्ञानाला प्रश्न विचारले पाहिजेत, असे मत युवा संशोधक अम्रिता हाजरा यांनी शुक्रवारी व्यक्त केले. रिसर्च या शब्दामध्ये रि आणि सर्च या दोन्हीचा समावेश आहे. त्यामुळे सतत प्रश्न विचारून चांगले आणि वाईट पडताळून घेणे महत्त्वाचे ठरते, अशी भूमिका त्यांनी मांडली.

‘केसरी’ प्रस्तुत ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’मध्ये भरड धान्यांच्या उपयुक्ततेवर संशोधन करणाऱ्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च’ (आयसर) संस्थेतील युवा संशोधक आणि ‘लोकसत्ता’च्या तरुण  तेजांकित पुरस्कार विजेत्या अम्रिता हाजरा यांची मुलाखत घेण्यात आली. रेश्मा राईकवार आणि भक्ती बिसुरे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. ‘केसरी’च्या झेलम चौबळ यांच्या हस्ते अम्रिता हाजरा यांचा सत्कार करण्यात आला. ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमामागची ‘लोकसत्ता’ची भूमिका मांडली.

मूलभूत संशोधन क्षेत्रामध्ये महिलांची संख्या कमी आहे का?, या प्रश्नाला उत्तर देताना हाजरा म्हणाल्या, महिलांची संख्या कमी आहे हे वास्तव आहे. पण, अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्येही संशोधन क्षेत्रात महिलांची संख्या कमीच आहे. शिक्षणानंतरचे महिलांचे प्राधान्यक्रम आणि करिअर या दोन्ही गोष्टी एकाच वेळी होत असल्यामुळे असे घडते. केवळ संशोधनाच्याच नव्हे, तर वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रामध्येही महिलांची संख्या कमी आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाकडे महिला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात. महिलांचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे हा दृष्टिकोनच वगळला जात आहे. ‘आयसर’मधील आमच्या विभागामध्ये ३२ पुरुषांमध्ये आम्ही केवळ चार महिला संशोधक आहोत. मात्र, संशोधनाच्या महत्त्वाच्या समित्यांमध्ये महिलांचा जाणीवपूर्वक समावेश केला जातो. विज्ञान संशोधनाचे क्षेत्र उत्कंठावर्धक आहे. प्रयोग अयशस्वी होतो तेव्हा नैराश्य जरूर येते, पण नव्या कल्पनांनी नैराश्यावर मात करून पुन्हा नव्या उभारीने कामामध्ये गढून जाते.

कार्यशाळा, प्रयोगशाळा आणि स्वयंपाकघरातील वैविध्यपूर्ण प्रयोगांतून मुलांमध्ये वैज्ञानिक विचार रुजविण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत, अशी अपेक्षा हाजरा यांनी व्यक्त केली. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील बर्कले विद्यापीठामध्ये पीएच. डी. करीत असताना भरड धान्य या विषयाकडे मी वळाले. त्या काळात तेथे दुष्काळ होता. डोंगर उतारावरील भागात कमी पाण्यात येणारी नाचणी, ज्वारी, बाजरी, वरई, सातू, राजगिरा अशी उत्पादने घेण्यासाठी तेथील शेतकऱ्यांशी मी बोलले. ही धान्ये तेथे पशुखाद्यं समजली जात होती. भरड धान्यांमधून पोषक जीवनसत्त्वे मिळत असल्याने त्यांचा आहारामध्ये समावेश केला पाहिजे याविषयी नागरिकांचे प्रबोधन केले. भरड धान्यांचे खाद्यपदार्थ करण्यासंदर्भात तेथील शेफशी केलेल्या चर्चेमध्ये यश आले, अशा शब्दांत त्यांनी प्रवास उलगडला. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत (एनसीएल) शास्त्रज्ञ असलेल्या आई-वडिलांमुळे विज्ञानाकडे आकर्षित झाले. आवडीच्या क्षेत्रात काम करताना मजा येते, असेही त्यांनी सांगितले.

तुमचे व्यक्तिमत्त्व अन्नाशी निगडित

तुमचे व्यक्तिमत्त्व हे तुमच्या अन्नाशी निगडित आहे, असे सांगून अम्रिता हाजरा म्हणाल्या,‘ भाकरी करण्याऐवजी ज्वारीचा डोसा करावा. ज्वारीच्या पिठापासून बिस्किटे, राजगिऱ्याची ब्राऊनी केली जाते. नाचणी, राजगिऱ्याचा उपमा करावा. भरड धान्यांपासून बिअरचीही निर्मिती केली जाते. शेवई, नूडल आणि पापड हे पदार्थ आहारात समाविष्ट करता येतात. यंदाचे वर्ष ‘भरड धान्याचे वर्ष’ घोषित करण्याची मागणी करणारे पत्र संयुक्त राष्ट्रसंघाला लिहिले आहे. धान्य सेंद्रिय आहे की नाही हे ओळखण्याचे परिमाण नसल्यामुळे ते सेंद्रिय आहे यावर विश्वास ठेवावा लागतो.’