तुमच्या मुलीच्या जन्मपत्रिकेत दोष आहे. त्या करिता शुद्धीकरण करून घ्यावे लागेल, असे सांगून लग्न करण्यास टाळाटाळ करीत असल्याने तरुणीने आत्महत्या केल्याची घटना पुण्यातील चंदननगर परिसरात घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पाच जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि तरूणी हे दोघे चंदननगर परिसरातील बोराटे वस्ती येथे राहण्यास होते. हे दोघे ही एकाच ठिकाणी राहत असल्याने, त्या दोघांमध्ये मैत्री होती. त्याचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी लग्न करण्याचे ठरविले. साखरपुडा करण्यात आला. मात्र त्यानंतर मुलीच्या पत्रिकेत दोष आहे, त्यामुळे शुद्धीकरण करावे लागेल. यासह अनेक कारणे सांगून वेळोवेळी लग्न करण्यास आरोपी आणि त्याचे कुटुंबीय सतत टाळाटाळ करीत राहिले. या त्रासाला कंटाळून  या तरुणीने घरातील फॅनला ओढणीच्या सहाय्याने, गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

आत्महत्या करण्यापूर्वी पूर्णा हिने सुसाईड नोट लिहून ठेवली असून त्यामध्ये सतत लग्नाला टाळाटाळ करीत असल्याने या सर्व गोष्टीला वैतागून आत्महत्या करीत असल्याचे त्यात म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे चंदननगर पोलिस स्टेशनच्या उपनिरीक्षक एस. एम. काळे यांनी दिली.