वैद्यकीय शाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने मुंबईतील एका खासगी रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या डॉक्टर तरुणीला बावन्न लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका डॉक्टरसह तिघांविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. आदित्य देशमुख (रा. मुंबई), नवल किशोर शिंदे (रा. भोसलेनगर, गणेशखिंड रस्ता) आणि उन्मेष निलफवार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. डॉ. शायना मूर्तझा पटेल (वय २६, रा. बेलासिस रस्ता, मुंबई) यांनी या संदर्भात बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शायना या सध्या मुंबईतील अपोलो रुग्णालयात कार्यरत आहेत. आरोपी डॉ. आदित्य देशमुख अपोलो रुग्णालयात कार्यरत आहे. डॉ. शायना यांची त्याच्याशी ओळख होती. डॉ. शायना यांनी त्यांचे वैद्यकीय शिक्षण नागपूर येथील एका वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण केले आहे.
डॉ. शायना यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमास (एमडी) प्रवेश घ्यायचा होता. सन २०१४ मध्ये डॉ. देशमुख याने त्यांना पिंपरीतील डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देतो, असे आमिष दाखविले होते. त्यासाठी पैसे द्यावे लागतील. माझे मित्र नवल शिंदे आणि उन्मेश निलफवार यांची पिंपरीतील वैद्यकीय महाविद्यालयात ओळख आहे, असे डॉ. देशमुख याने त्यांना सांगितले. त्यानंतर शिंदे डॉ. शायना यांना मुंबईत भेटला. तेथे त्यांच्याकडून पाच लाख रुपये घेतले. त्यानंतर डॉ. शायना या पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शिंदे आणि निलफवार यांना भेटल्या. डॉ. देशमुख, शिंदे आणि निलफवार यांनी डॉ. शायना यांच्याकडून वेळोवेळी नव्वद लाख रुपये उकळले. दरम्यान, डॉ. शायना यांनी आरोपींकडे प्रवेशासाठी पाठपुरावा केला. पैसे देण्याची मागणी त्यांच्याकडे केली. आरोपींनी डॉ. शायना यांना ३८ लाख रुपये परत केले. पुढच्या वर्षी तुम्हाला प्रवेश मिळवून देतो, अशी बतावणी आरोपींनी त्यांच्याकडे केली. अखेर फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर डॉ. शायना यांनी मुंबईतील नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर हा गुन्हा पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्याकडे तपासासाठी सोपविण्यात आला.