धावत्या ट्रेनमधून पडल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, या उपचारांदरम्यानच त्याची प्राणज्योत मालवली. प्रकाश दत्ताराम नारे असे या तरुणाचे नाव आहे. तो त्याच्या कुटुंबातील कमवता असलेला एकटाच होता. त्याच्या मृत्यूमुळे नारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रकाश नारेचा अपघात पिंपरी स्टेशनजवळ झाला. जखमी अवस्थेत त्याला पिंपरी येथील यशवंतराव स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

प्रकाश नारे हा मूळचा नांदेड (नायगाव) चा असून तो मुंबईत एका हॉटेलमध्ये नोकरी करत होता. मिळालेल्या पगारात तो त्याच्या आईचा आणि लहान भावाचा सांभाळ करत असे. रविवारी प्रकाश मुंबईतून काही कामासाठी पुण्यात आला होता. त्याच्या चुलत भावाने त्याला घरी बोलावले. मात्र रविवारी जाता न आल्याने तो सोमवारी सकाळी चुलत भावाकडे गेला. तिथून मुंबईकडे परतत असताना पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ त्याचा तोल गेला आणि तो धावत्या ट्रेनमधून खाली पडला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याने प्राण सोडले. त्यामुळे त्याच्या आईवर आणि लहान भावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.