पिंपरी-चिंचवडच्या चिखली येथे एका २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. गुरुवारी सकाळी राहत्या घरी त्याने आपले आयुष्य संपवले. रोहित सुभाष कांबळे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणाचा निगडी पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ वर्षीय रोहित सुभाष कांबळे या तरुणाने सकाळी साडेनऊच्या सुमारास राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी घरात त्याची वहिनी आणि भाऊ होता. रोहित सकाळी बेडरूममध्ये गेल्यानंतर बराच वेळ बाहेर आला नाही. तो बाहेर का येत नाही, हे पाहायला गेल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत रोहितचा मृत्यू झाला होता. तो अविवाहित होता. आई आणि भाऊ यांच्यासोबत तो राहत होता. त्याने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड याप्रकरणाचा तपास करत आहेत.