05 April 2020

News Flash

साहित्य महामंडळाला आता युवा संमेलनाचे वेध

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यापातून मोकळे झाल्यानंतर साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आता युवा संमेलनाचे वेध लागले आहे.

पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यापातून मोकळे झाल्यानंतर साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आता युवा संमेलनाचे वेध लागले आहे. एकीकडे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असली, तरी राज्य सरकारने सोपविलेली ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून महामंडळाचे पदाधिकारी आपल्या शिरपेचात तुरा खोवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
तीन वर्षांसाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे आले आहे. ही मुदत संपण्यास अद्याप दोन महिन्यांचा कालावधी आहे. १ एप्रिलपासून विदर्भ साहित्य संघाकडे महामंडळाचे कार्यालय जाणार आहे. या दोन महिन्यांत राज्य सरकारशी संपर्क साधून २५ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त करून घेण्यासाठी सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांच्याशी लवकरच संपर्क साधण्यात येणार असल्याचे साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी सांगितले. प्रकाश पायगुडे आणि सुनील महाजन हे माझे दोघेही सहकारी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीमध्ये व्यग्र असले, तरी हे युवा संमेलन झाले पाहिजे याबाबत महामंडळाच्या सर्वच सदस्यांचे एकमत आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. घुमान येथील साहित्य संमेलन, अंदमान येथील विश्व संमेलन, पिंपरी-चिंचवड येथील साहित्य संमेलन झाल्यानंतर आता औरंगाबाद येथे युवा संमेलन यशस्वी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही त्यांनी सांगितले. राज्य सरकारकडून निधी प्राप्त होईल अशी आशा आहे. त्यानंतर महामंडळाची बैठक बोलावून युवा संमेलनाचे नियोजन करता येणे शक्य होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सासवड येथे झालेल्या साहित्य संमेलनामध्ये युवकांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्यासाठी युवा संमेलनाचे आयोजन करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. केवळ घोषणा करूनच ते थांबले नाहीत. तर, या युवा संमेलनासाठी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात येणार असून अशा संमेलनांचे आयोजन करण्याची जबाबदारी त्यांनी साहित्य महामंडळावरच सोपविली होती. मात्र, दोन वर्षांत पत्रव्यवहार करण्याखेरीज काहीच घडले नाही. महामंडळ केवळ संमेलने भरविते अशी टीका केली जात असल्याने आता युवा संमेलनाची जबाबदारी आपल्या शिरावर घेऊ नये, अशी भूमिका घेत महामंडळातील काही सदस्यांनी विरोध केला होता. मात्र, सरकारने सोपविलेली जबाबदारी टाळता येणार नाही, असे धोरण स्वीकारत महामंडळाने विरोधाची धार बोथट करण्यासाठी औरंगाबाद येथे हे संमेलन घेण्याची घोषणा केली. या संमेलनाचे यजमानपद मराठवाडा साहित्य परिषदेकडे सोपविण्यात आले आहे. मात्र, सरकारचे अनुदान आल्याखेरीज संमेलन घेता येणे शक्य होणार नाही, असे मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्या पाश्र्वभूमीवर हे संमेलन व्हावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे डॉ. माधवी वैद्य यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2016 3:20 am

Web Title: youth convention sahitya sammelan
टॅग Sahitya Sammelan
Next Stories
1 वकिलांना मिळाला नकाराधिकार..
2 ‘जय भारत जय जगत’ व्याख्यानमालेतून धर्माधिकारींचा जगासमोरील आव्हानांचा वेध
3 शिक्षण मंडळाने थकवले पावणेदोन कोटी
Just Now!
X