लोणावळ्यात सध्या पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे पर्यटनस्थळी नागरिकांची रिघ लागायला सुरूवात झाली आहे. अशातच पर्यटकांना अनेकवेळा सेल्फीचा मोह आवरता येत नाही. परंतु हा मोह स्वतःचा जीवावर देखील बेतू शकतो. भुशी डॅम येथे रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पाण्यात उतरून तीन तरुण सेल्फी काढण्यास गेले. परंतु, त्यातील एक तरुण गाळात रुतला आणि पाण्यात बुडाला. सायंकाळी सातच्या सुमारास बुडालेल्या तरुणाचा मृतदेह मिळाला.

तिरूपती राजाराम उलवाड (वय २५, मूळ रा. संगूचीवाडी ता.कंदार, जि.नांदेड, सध्या काळेवाडी, पिंपरी चिंचवड) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिरुपतीची पत्नी काही दिवसांसाठी गावी गेली होती. त्यामुळे घरात तो एकटाच होता. मौजमजा करण्यासाठी तो सहा मित्रांसमवेत लोणावळ्याच्या भुशी डॅम येथे गेला. थट्टा मस्करी सुरू होती. सहा मित्रांपैकी तिघांना पोहता येत नसल्याने ते बाहेर थांबले. तिरुपती आणि त्याचे मित्र पाण्यात उतरत पोहत असताना त्यांना सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. खोल पाण्यात जात असताना तिरुपती गाळात रुतला. त्याची हालचाल होत नव्हती. मित्रांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पाण्यात बुडाला.

दरम्यान, मृत तिरुपती उलवाड हा त्याच्या पत्नी समवेत काळेवाडी येथे राहतो. खासगी कंपनीत काम करून तो आपला संसार चालवत होता. दीड वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला होता.

तिरूपतीचा मृतदेह मिळत नसल्याने लोणावळा शहर पोलिसांनी स्थानिक पोलिस मित्रांच्या मदतीने मृतदेह सातच्या सुमारास बाहेर काढला. घटनास्थळी पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील, सहायकक पोलीस निरीक्षक रांगाट हे देखील होते.