दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केलेल्या युवा संमेलनाचे राज्य सरकारलाच विस्मरण झाले आहे. हे संमेलन घेण्यासंदर्भात सांस्कृतिक आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभाग या सरकारच्याच दोन खात्यांमध्ये विसंवाद असल्याने या संमेलनाचा गाडा जागेवरच अडल्याची माहिती सोमवारी उघड झाली.
अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाच्या धर्तीवर युवकांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशातून त्या वेळचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील युवकांसाठी युवा संमेलनाचे आयोजन करण्याची घोषणा केली. या संमेलनासाठी २५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद सरकार करेल अशी ग्वाही देतानाच या संमेलनाच्या आयोजनामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने पुढाकार घ्यावा, अशी सूचनाही चव्हाण यांनी केली होती. या घटनेला दोन वर्षे उलटून गेली असून हे संमेलन का होऊ शकले नाही, अशी विचारणा केली असता सांस्कृतिक आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभाग या सरकारच्याच दोन खात्यांमध्ये घोळ असल्याने युवा संमेलन होऊ शकले नाही, यावर साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य आणि कोशाध्यक्ष सुनील महाजन यांनी प्रकाशझोत टाकला.  
पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत साहित्य महामंडळाने युवा संमेलनाच्या आयोजनाची तयारी आणि या संमेलनात होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा याविषयीचा प्रस्ताव सरकारकडे सादर केला होता. कोशाध्यक्ष सुनील महाजन यांनी हा प्रस्ताव सादर केल्यानंतर सरकारकडून कोणतेच उत्तर आले नाही, याकडे माधवी वैद्य यांनी लक्ष वेधले.
सुनील महाजन म्हणाले, युवा संमेलनाचा प्रस्ताव सांस्कृतिक खात्याकडे सादर केला असता त्यांनी हा निधी सरकारने शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाकडे वर्ग केला असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाकडे प्रस्ताव दिला. मात्र, अशा स्वरूपाच्या कोणत्याही निधीची तरतूद झाली नसल्याचे या विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. दोन खात्यांमधील घोळ संपत नसल्यामुळे युवा संमेलन होऊ शकले नाही हे वास्तव आहे. मात्र, राज्यातील नव्या सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्यास हे संमेलन व्हावे यासाठी पुन्हा प्रयत्न करण्यात येतील.
‘मसाप’चे युवा संमेलन बारामतीला
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे तिसरे युवा नाटय़-साहित्यसंमेलन शनिवारपासून (२१ मार्च) दोन दिवस बारामती येथे होणार आहे. प्रसिद्ध लेखक-नाटककार अभिराम भडकमकर यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून, साहित्य परिषदेची बारामती शाखा या संमेलनाची निमंत्रक आहे. भिगवण रस्त्यावरील नटराज नाटय़ कला मंडळाच्या सभागृहामध्ये शनिवारी शारदानगर शैक्षणिक संकुलाच्या विश्वस्त सुनंदा पवार यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. या संमेलनामध्ये गौरी लागू, रोहित चंदावरकर, राज काझी, प्रकाश बंग, संजय आवटे, श्रीनिवास भणगे, दीपक करंजीकर हे विविध सत्रांमध्ये युवकांशी संवाद साधणार आहेत. वैभव जोशी आणि हृषीकेश जोशी यांचा ‘काहीच्या काही’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्थानिक युवक-युवतींचे कविसंमेलन होणार आहे. रविवारी (२२ मार्च) एन्व्हायर्नमेंट फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप होणार असल्याची माहिती डॉ. माधवी वैद्य आणि प्रकाश पायगुडे यांनी सोमवारी दिली. परिषदेच्या बारामती शाखेचे अध्यक्ष संजय जाधव या वेळी उपस्थित होते.