सातत्याने येत असलेल्या फिट्स.. तपासणीनंतर मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी असल्याचे झालेले निदान.. आई-वडिलांचे छत्र हरपल्यामुळे जवळ पैसे नाहीत की नातेवाईकही.. विधायकता जपत नवशक्ती मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जमलेली वर्गणी सतीश जोरी या सहकाऱ्याच्या उपचारासाठी देत त्याला जीवदान दिले. गणरायाच्या कृपेनेच सतीशला ‘नवशक्ती’ मिळाली.

२२ वर्षांचा सतीश जोरी हा बालपणापासूनच नवी पेठेतील नवशक्ती  मंडळाचा कार्यकर्ता आहे. आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर मंडळ हेच त्याचं कुटुंब झाले. गणेशोत्सव जवळ येत असल्याने आनंदात असलेल्या सतीशला नियतीने संकटात टाकले. सातत्याने फिट येत असल्याने तपासणी केली असता त्याच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी झाल्याचे समोर आले. त्याच्यावर आलेले विघ्न दूर करण्यासाठी गणराय नवी पेठेतील नवशक्ती मित्र मंडळाच्या रुपाने समोर आले. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जमा झालेली वर्गणी त्याच्या उपचारासाठी दिली. काही दिवसांपूर्वी फिट येऊन रस्त्यात पडलेल्या सतीशला नागरिकांनी घरी आणून सोडले. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करायला सांगितली तेव्हा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ७५ हजार रुपये शस्त्रक्रियेसाठी दिले.

नवशक्ती मित्र मंडळाचे व्यवस्थापक संतोष ठोंबरे म्हणाले, सतीशची प्रकृती आता सुधारत आहे. त्याच्या मदतीला धावून जाण्याची बुद्धी गणरायानेच आम्हाला दिली. यंदाचा गणेशोत्सव आम्ही साधेपणाने साजरा करणार असून मिरवणूकदेखील रद्द केली आहे. आम्ही सर्व जण आमच्यापरीने सतीशला मदत करत असून तो लवकर बरा होईल अशी खात्री वाटते.