युवक-युवतींशी संवाद साधण्यासाठी आणि ज्या तरुणाईला सल्ला, मार्गदर्शन हवे असेल त्यांना योग्य ती माहिती देण्यासाठी महापालिकेने पाऊल उचलले असून खास तरुणाईसाठी ‘हॅलो माय फ्रेंड’ ही हेल्पलाईन सुरू करण्यात येत आहे. राष्ट्रीय युवक दिनाचे औचित्य साधून सोमवारी या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. कॉल सेंटर, सल्ला केंद्र, तसेच इंटरनेटच्या माध्यमातून ही हेल्पलाईन कार्यान्वित राहील.
पुण्यातील तरुणाईला योग्य मार्गदर्शन मिळावे, योग्य दिशा मिळावी आणि हे काम पुणेकरांनीच करावे हा हेल्पलाईन सुरू करण्याचा मुख्य उद्देश आहे. उपमहापौर आबा बागूल यांच्या संकल्पनेतून हेल्पलाईनचा उपक्रम सुरू होत असून महापालिकेच्या नागरवस्ती विकास विभागातर्फे तो राबवला जाणार आहे. पंधरा ते पंचवीस या वगोगटातील तरुण, तरुणींसाठी हेल्पलाईनचा उपक्रम चालवला जाणार असून या माध्यमातून तरुणांना ज्या विषयाबाबत मार्गदर्शन हवे असेल, सल्ला हवा असेल त्यांना तो तज्ज्ञांकडून दिला जाईल. युवक, युवतींना काही वैयक्तिक प्रश्न असतील, तर त्याबाबत चर्चा करण्यासाठी एक केंद्रही उघडले जाणार आहे. शिक्षण, स्पर्धा परीक्षा, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, व्यापार, व्यवसाय मार्गदर्शन, समुपदेशन, समाजकारण, राजकारण, सेवा आदी अनेक क्षेत्रात काम करत असलेल्या व या क्षेत्राचा अनुभव असलेल्या पुणेकरांकडून या उपक्रमात तरुणांना मार्गदर्शन केले जाईल, अशी माहिती उपमहापौर बागूल यांनी दिली.
उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात हेल्पलाईन सुरू केली जाईल व त्यासाठी युवकांना टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला जाईल. शिक्षण, व्यवसाय, उद्योग, उच्च शिक्षण आदी अनेक विषयांबाबत या क्रमांकावर तरुणांना माहिती तसेच सल्ला देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. शैक्षणिक मार्गदर्शन, व्यवसाय मार्गदर्शन, उच्चशिक्षणासाठी मार्गदर्शन आणि समुपदेशन अशा स्वरुपाचे काम या उपक्रमांतर्गत चालेल. त्या बरोबरच युवकांसाठी कार्यशाळा आणि व्याख्यानांचेही आयोजन केले जाणार आहे.
 या हेल्पलाईन उपक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर काम पाहणार आहेत. मृणाल कुलकर्णी, प्राजक्ता माळी, महेश टिळेकर हे या संकल्पनेचा प्रसार करणार आहेत. अविनाश धर्माधिकारी, विवेक वेलणकर, श्रीराम गीत, इसार कुरेशी, डॉ. शरद जोशी, एस. बी. मंत्री, वंदन नगरकर, डॉ. संज्योत देशपांडे, डॉ. अनघा लवळेकर, प्राचार्य प्रकाश बोकील, प्रा. जयंत पानसे, मिलिंद गुंजाळ, निवृत्त कर्नल प्रदीप ब्राह्मणकर, अ‍ॅड. रुचिर कुलकर्णी, अंकुश काकडे, डॉ. सतीश देसाई आदींचा सहभाग या उपक्रमात असेल.