पिंपरी-चिंचवडच्या निगडी परिसरात पूर्ववैमनस्यातून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला. ही घटना संध्याकाळी पाचच्या सुमारास घडली असून आरोपी हा फरार झाला आहे. अमित पंडित कांबळे अस हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी परिसरातील पत्राशेड अजंठा नगर येथे अमित पंडित कांबळे (वय-२२ रा.कृष्णा नगर,समाधान हौसिंग सोसायटी)याची हत्या करण्यात आली. अमित स्वत: कृष्णा नगर येथे वास्तव्याला होता. मात्र, तो अनेकदा अजंठानगर पत्राशेड येथील आपल्या नातेवाईकांकडे जायचा. काही दिवसांपूर्वी याठिकाणी त्याचे एका तरुणाशी भांडण झाले होते. याचाच राग मनात धरून शनिवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास संबंधित तरुणाने दगडाने ठेचून अमितची हत्या केल्याचा संशय आहे. हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या नेतृत्त्वाखाली निगडी पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास हे करत आहेत.