News Flash

आत्महत्या प्रतिबंधक हेल्पलाइनवर सर्वाधिक फोन किशोरवयीन व तरुणांचे

आत्महत्यांचे प्रमाण पुरुषांमध्ये अधिक

आत्महत्यांचे प्रमाण पुरुषांमध्ये अधिक

प्रेम प्रकरणे व नातेसंबंधांमधील विसंवाद, कौटुंबिक समस्या तसेच लैंगिक बाबींशी निगडित समस्या किशोरवयीन व तरुणांच्या मानसिक स्वास्थ्यास मारक ठरत आहेत. ‘कनेक्टिंग’ या आत्महत्या प्रतिबंधक हेल्पलाइनवर गेल्या सहा महिन्यांत सर्वाधिक दूरध्वनी १५ ते २९ या वयोगटातील व्यक्तींचे आले आहेत.

मदत मागणाऱ्यांमध्ये स्त्रियांपेक्षा पुरुषांची संख्या खूप जास्त होती. संस्थेकडे आलेल्या एकूण ७१७ दूरध्वनींपैकी ५६३ दूरध्वनी पुरुषांचे होते, १४९ स्त्रियांचे, तर ५ दूरध्वनी तृतीयपंथीयांकडून आले होते. २०१४ मध्ये झालेल्या आत्महत्यांच्या आकडेवारीनुसार आत्महत्यांचे प्रमाण पुरुषांमध्ये अधिक असल्याचे समोर आले आहे.

आत्महत्या प्रतिबंधक दिनाच्या (१० सप्टेंबर) निमित्ताने संस्थेने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. संस्थेतर्फे ‘समन्वय संस्कारासाठी आत्महत्या प्रतिबंधन’ या पुस्तकाचे ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. वासुदेव परळीकर यांच्या हस्ते प्रकाशनही करण्यात आले. संस्थेच्या प्रमुख समन्वयक मेधा काळे या वेळी उपस्थित होत्या.

सहा महिन्यांच्या कालावधीत संस्थेच्या हेल्पलाइनवर मदतीसाठी ७१७ दूरध्वनी आले असून त्यातील ३६० दूरध्वनी किशोरवयीन व तरुण वयाच्या व्यक्तींचे आहेत. त्याखालोखाल २३३ दूरध्वनी ३० ते ४९ या वयोगटातून आले. त्यामागेही कौटुंबिक समस्या, लैंगिक बाबी आणि मानसिक आजार ही कारणे आढळून आली. जगात २०१४ मध्ये आठ लाख व्यक्तींनी आत्महत्या केल्या. त्यात भारतात १ लाख ३४ हजार आत्महत्या झाल्या असून देशात महाराष्ट्रात सर्वाधिक- १६,३०७ आत्महत्या झाल्या, तर पुण्यातील आत्महत्यांची संख्या ८५२ होती. आत्महत्यांमागील सर्वात मोठे कारण कुटुंबातील विसंवाद व नातेसंबंधातील समस्या हे होते. त्यानंतर मानसिक आजार, चिवट व दुर्धर आजार हे आत्महत्यांचे कारण ठरले. या आकडेवारीत पुरुषांचे प्रमाण स्त्रियांपेक्षा जास्त होते, परंतु १८ वयापर्यंत प्रमाण समान राहिले. स्वत:चा व्यवसाय व रोजगार असणाऱ्यांमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण सर्वाधिक, तर त्यानंतर गृहिणींचे प्रमाण अधिक होते. सर्वाधिक आत्महत्या गळफास घेऊन झाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2016 12:06 am

Web Title: youth phone calling at suicide prevention helpline
Next Stories
1 ‘एचए’ वसाहतीतील सुविधांसाठी पालिकेने ५० लाख द्यावेत
2 पिंपरीतील ‘लक्ष्य २०१७’ साठी अजितदादांचे गणेश मंडळ अभियान
3 शहरविकासाचे राष्ट्रवादीचे दावे खोटे; चिंचवडप्रमाणे भोसरी, पिंपरीचा विकास नाही
Just Now!
X