अग्निशामक दलाकडून तरुणांची सुटका; तरुणांमुळे श्वानही सुखरूप

पुणे : खडकवासला धरणालगत मोरीच्या परिसरात पंचवीस फूट खाली एक श्वान अडकून पडले होते..जीव वाचविण्यासाठी ते धडपड करीत होते. त्याची ती निर्थक ठरणारी धडपड या परिसरात फिरण्यास आलेल्या तीन तरुणांच्या लक्षात आली. त्यांनी स्वत:ची परवा न करता पाण्यातील एका खडकावर उतरून श्वानाला बाहेर काढले. पण, पाण्याने वेढलेल्या खडकावर ते स्वत:च अडकून पडले. अग्निशामक दलाच्या जवानांनी काही वेळाने त्यांना तेथून बाहेर काढले. एका श्वानासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या या तरुणांचे कौतुक करण्यात येत आहे.

मेहबूब विजापूरकर (वय २०), अजय मराठे (वय २०), सचिन यादव (वय २४, तिघे रा. वारजे माळवाडी) अशी या तरुणांची नावे आहेत. खडकवासला धरणालगत मोरीच्या पुढे काही अंतरावर छोटा पूल आहे. तेथे पंचवीस फूट खोलीवर एक श्वान अडकले असल्याची माहिती सिंहगड अग्निशमन दलाच्या केंद्राला रविवारी सकाळी आठच्या सुमारास मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. जवानांनी परिसराची पाहणी केली. तेव्हा तेथील एका खडकावर तीन तरुण उभे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. खडकाच्या चारही बाजूला पाणी होते. त्यामुळे तरूण बाहेर येऊ शकत नव्हते. त्यामुळे जवान पाण्यात उतरून पोहत तरुणांजवळ पोहोचले. श्वानाला वाचविले मात्र आपण अडकल्याचे तरुणांनी जवानांना सागितले.

श्वानाला वाचविण्यासाठी हे तरुण खाली उतरले होते. रस्त्याने जात असलेल्या एका टेम्पोतील दोरी आणि काही नागरिकांच्या मदतीने त्यांनी श्वानाला सुखरूप वपर्यंत पोहोचविले होते. मात्र, त्याच दोरीच्या आधाराने तरुणांना वर येता आले नाही. त्यामुळे ते अडकून पडले होते. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी मुख्य केंद्राला या घटनेची माहिती दिली.

तेथून अत्याधुनिक शिडी मागविण्यात आली.अग्निशमन दलाचे जवान गणेश ससाणे, शिवाजी आटोळे, विलास घडशी, प्रमोद मरळ यांनी तीनही तरुणांना शिडीच्या साहाय्याने बाहेर काढले.