‘समाजात दारू-सिगारेटच्या व्यसनांचे प्रमाण वाढते आहे, ही गोष्ट मनाला दु:ख देते. तंबाखू किंवा गुटख्याच्या पुडीसाठी जीवन पणाला लावणे ही शरमेची गोष्ट आहे. मरायचेच असेल तर देशासाठी भगतसिंगांसारखे मरावे. आनंद असा हवा, ज्या आनंदाचा नंतर पश्चात्ताप होणार नाही,’ अशा भावना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त केल्या.
‘युवा फिनिक्स फाउंडेशन’ आणि ‘आदर्श मित्र मंडळा’तर्फे देण्यात येणारा ‘युवा फिनिक्स जीवन गौरव पुरस्कार’ निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांच्या हस्ते डॉ. अवचट यांना रविवारी देण्यात आला. अभिनेते मनोज जोशी, फाउंडेशनचे सचिन जामगे या वेळी उपस्थित होते.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह गायकवाड यांचा या वेळी दत्तवाडी पोलीस ठाण्याअंतर्गत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गोखले यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. तर सामाजिक कार्यकर्त्यां डॉ. वनमाला शिंदे, गुणवंत विद्यार्थी अमित जाधव आणि कबड्डीपटू स्नेहल शिंदे आदींना युवा फिनिक्स पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. पंचवीस गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना मनोज जोशी यांच्या हस्ते शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
डॉ. अवचट म्हणाले, ‘‘झोपडीतले जीवन काय असते हे मला माहीत आहे. ‘हल्ली झोपडीत सगळ्या सुखसोयी असतात’, असे म्हणणाऱ्या उच्चभ्रू मंडळींनी एक दिवस तिथे राहून दाखवावे! त्यामुळे अशा परिस्थितीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी निर्भय बनावे, शिकून मोठे व्हावे. पण उच्चभ्रू संस्कृतीचा भाग बनू नये! आपले लक्ष नेहमी गरिबांकडे असू द्यावे.’’
गोखले यानी सांगितले, ‘‘देशातील तीस टक्के लोकसंख्या पंधरा वर्षांवरील आहे. तरूणांना कमकुवत बनवण्यासाठी परदेशातून आपल्या देशात मुद्दाम ड्रग्ज आणण्याचा उद्योग चालतो. जाणत्या वयात माणसावर सर्वाधिक संस्कार मित्रमैत्रिणींचे होत असतात. या मित्रमैत्रिणींपैकी अनेक जण व्यसने करण्याचा सल्ला देणारेही भेटतात. या लोकसंख्येला योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास तिचा मोठा बाँब बनू शकेल! ’’