जिल्हा परिषदेच्या सभागृहात नगरसेवकांनी गोंधळ आणि बेशिस्तीचे प्रकार पुन्हा केल्यास यापुढे जिल्हा परिषदेचे सभागृह महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी मिळणार नाही, अशी तंबी सोमवारी देण्यात आली. जिल्हा परिषदेने दिलेल्या या तंबीची चर्चा महापालिकेत चवीने सुरू आहे.
महापालिका सभागृहाचे नूतनीकरण सुरू असल्यामुळे सध्या सर्वसाधारण सभा जिल्हा परिषदेच्या सभागृहात होत आहे. नूतनीकरणाचे काम तीन महिने चालणार आहे. जिल्हा परिषद सभागृहात आतापर्यंत कामकाज झालेल्या महापालिकेच्या दोन्ही सभांमध्ये फार मोठा गोंधळ झाला आणि महापालिका सभेत जे प्रकार घडतात, तसेच प्रकार नगरसेवकांनी जिल्हा परिषदेच्याही सभागृहात केले. ध्वनिवर्धकाची मोडतोड, कागदपत्रांची फाडाफाडी, हाणामाऱ्या, गलिच्छ भाषा असे प्रकार सभेत झाले. तसेच अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात मनसेच्या नगरसेविकाही मागे राहिल्या नाहीत.
या प्रकाराची गंभीर दखल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्ता भरणे यांनी घेतली असून जिल्हा परिषदेच्या सभागृहात पुन्हा असे प्रकार होणार असतील, तर पुन्हा आमचे सभागृह मिळणार नाही, अशी तंबी त्यांनी सोमवारी दिली. त्यांनी दिलेल्या या तंबीची चर्चा नगरसेवकांमध्ये चवीने सुरू आहे.