महापालिकेच्या पथ विभागाचा निर्णय

पुणे : शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, या हेतूने शहरातील पंचवीस चौकांमध्ये वाहनचालकांसाठी तसेच पादचाऱ्यांसाठी त्रिमितीय (थ्री-डी) पद्धतीचे पट्टे रंगवण्यात येणार आहेत. महापालिकेच्या पथ विभागाने तसा निर्णय घेतला असून वाहतूक पोलिसांशी चर्चा करून गर्दीचे चौक निश्चित करण्यात येणार आहेत. वाहतूक पोलिसांनी केलेल्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

शहरातील वाहनांची वाढती संख्या आणि बेशिस्त वाहतूक लक्षात घेऊन त्रिमितीय पद्धतीने पट्टे रंगवलेली झेब्रा क्रॉसिंग यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला होता. गोल्फ क्लब रस्त्यावरील येरवडा वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षेत्रात शहरात हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आला होता. असा प्रयोग राबविणारे पुणे हे राज्यातील पहिलेच शहर ठरले होते. या नव्या संकल्पनेनुसार आता शहरातील आणखी पंचवीस चौकांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.

वाहतूक पोलीस आणि महापालिका पथ विभागाच्या अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. त्यानुसार पंचवीस चौकात ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकातही आर्थिक तरतूद उपलब्ध आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ही कारवाई सुरू आहे. झेब्रा क्रॉसिंगवर दुचाकी उभ्या करणाऱ्या गाडय़ांवर कारवाई करताना वाहनचालक आणि पोलीस यांच्यात हुज्जत होण्याचे प्रकारही होतात. झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे दिसत नाहीत, अशा तक्रारीही वाहनचालकांकडून सातत्याने करण्यात येत होत्या.

त्रिमितीय झेब्रा क्रॉसिंग यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्यानंतर वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासही ही यंत्रणा उपयुक्त ठरत असल्याचे निदर्शनास आले होते. झेब्रा कॉसिंगचे पट्टे वाहनचालकांना लांबूनच निदर्शनास येत असल्यामुळे झेब्रा क्रॉसिंगवर दुचाकी थांबविण्याच्या प्रमाणातही घट झाली होती, अशी माहिती पालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी दिली.

योजना काय ?

या योजनेत विशिष्ट रंगसंगतीच्या सहाय्याने रस्त्यावर पादचारी पट्टे रंगवण्यात येतात. एखादा दुचाकीस्वार किंवा वाहनचालक भरधाव आला, तरी त्याला लांबूनच हे पट्टे दिसतात. त्यामुळे वाहनांचा वेग कमी होण्यास मदत होते व वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघनही होत नाही.