व्यवसायावर विपरित परिणाम, १५ हॉटेल बंद पडल्याचा आरोप

ग्राहकांना मोठमोठय़ा सवलती देणाऱ्या ‘झोमॅटो गोल्ड’ या ऑनलाइन सेवेतून बाहेर पडण्याचा निर्णय पुणे रेस्तराँ अँड हॉटेलिअर असोसिएशनने घेतला आहे. ‘झोमॅटो गोल्ड’कडून दिल्या जाणाऱ्या सवलतींचा विपरित परिणाम हॉटेल व्यवसायावर होत आहे. परिणामी, गेल्या तीन महिन्यांत १५ हॉटेल  बंद पडल्याचा आरोप करत असोसिएशनने ‘झोमॅटो गोल्ड’ या सेवेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे रेस्तराँ अँड हॉटेलिअर असोसिएशनला शहरातील ८५० हॉटेल संलग्न आहेत. हॉटेल हे क्षेत्र सर्वाधिक रोजगार निर्माण करणाऱ्या उद्योग क्षेत्रांपैकी एक आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या क्षेत्राला अडचणींचा सामना करावा लागत आहे. वस्तू आणि सेवा करासारख्या काही घटकांमुळे व्यवसाय अडचणीत आला आहे. झोमॅटो गोल्डसारख्या सेवांकडून दिल्या जाणाऱ्या सवलतींमुळे या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या अटी-नियमांनुसार काम करणे शक्य नाही, असे पुणे रेस्तराँ अँड हॉटेलिअर असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

‘देशातील सर्वाधिक हॉटेलिंग होणाऱ्या शहरात पुणे आघाडीवर आहे. आमच्या हॉटेलांमध्ये वर्षांनुवर्षे येणारे ग्राहक आहेत. मात्र, झोमॅटो गोल्डकडून मोठमोठय़ा सवलती दिल्या जातात. जवळपास ५० टक्क्य़ांपर्यंत सवलती दिल्या जात असल्याने ग्राहक हॉटेलकडे वळत नाहीत. या सेवेमुळे हॉटेल व्यवसाय वाढण्याऐवजी प्रचंड फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही परिस्थिती सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ग्राहकांना अधिक चांगली सेवा, खाद्य पदार्थ देण्याचा आमचा प्रयत्न असेल,’ असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.