बाजारपेठेचा राजा असलेल्या ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी कोण काय क्लृप्त्या वापरेल याचा काही नेम नाही. पूर्वी ग्राहकांना सवलत दिली जात होती. नंतरच्या काळात ‘४९ अॅन्ड ९९’ चा जमाना आला. पुढे तर, एकावर एक मोफत (बाय वन गेट वन फ्री) अशी पद्धती सुरू झाली. आता दीड हजार रुपयांच्या ग्रंथखरेदीवर वाचनप्रेमींना चक्क एक डझन आंबे मोफत देणारी सवलत आली आहे. ‘शब्दनादा’सवे चाखा आंब्याचा स्वाद असेच जणू ग्राहकांना ही सवलत देणाऱ्याना सांगायचे आहे.
‘साहित्य दरबार’ संस्थेतर्फे यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे ‘शब्दनाद’ हे मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचा समावेश असलेले ग्रंथप्रदर्शन भरविण्यात आले आहे. यामध्ये दीड हजार रुपये मूळ किमतीच्या ग्रंथखरेदी करणाऱ्या साहित्यप्रेमीला देवगड येथील डामरी आंबेवाले यांच्या बागेतील आंबे चक्क एक डझन मोफत देण्याची योजना आहे. नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांच्या सहकार्याने ३१ मेपर्यंत ही योजना राबविण्यात येणार असून दररोज सकाळी दहा ते रात्री नऊ या वेळात हे ग्रंथप्रदर्शन खुले राहणार आहे, असे साहित्य दरबारचे विनायक धारणे यांनी कळविले आहे.