पुणे : शहरातील करोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असतानाच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. वैद्यकीय उपचार करून बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांच्या संख्येने मंगळवारी रात्री १० हजार ४५२ चा टप्पा गाठला. शहरातील एकूण करोना रुग्णापैकी ६१ टक्के  रुग्ण बरे झाले आहेत. देश आणि राज्याच्या सरासरीपेक्षा पुण्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याचा दावा महापालिके च्या आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे.

शहरात मार्च महिन्यात करोनाचा संसर्ग सुरू झाला आणि ३१ मार्च रोजी करोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर करोनाबाधितांची संख्याही वाढू लागली. महापालिके च्या आकडेवारीनुसार मंगळवारी रात्रीपर्यत शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या १७ हजार २२८ होती. त्यापैकी बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या १० हजार ४५२ आहे. तर मंगळवारी रात्रीपर्यंत करोनामुळे मृत झालेल्यांची एकूण संख्या ६४३ आहे. करोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिके ने तपासण्यांचे प्रमाण वाढविले आहे. मान्यताप्राप्त खासगी प्रयोगशाळांबरोबरही करार के ला असून त्याचा खर्च महापालिका देणार आहे. तपासण्यांचे प्रमाण वाढल्यामुळे करोना संसर्गाचे निदान तातडीने होणे शक्य झाले आहे.

हे प्रमाण पहात देशात आणि राज्याच्या सरासरीपेक्षा पुण्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याचा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे. शहरातील एकूण बाधित रुग्णांपैकी ३८ टक्के  अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून मृत्यूचे प्रमाण ३.६९ टक्याहून कमीत कमी करण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे.

सर्वाधिक ४ हजार ३८ नागरिकांचे स्वॅब नमुने

शहरात सोमवारी सर्वाधिक ४ हजार ३८ नागरिकांचे स्वॅब नमुने घेण्यात आले. शहरात आत्तापर्यंत एकूण १ लाख १२ हजार ४१ नागरिकांचे स्वॅब नमुने संकलीत करण्यात आले. त्यापैकी एकूण १६ हजार ७४२ व्यक्ती करोनाबाधित आढळून आल्या. तर ६ हजार १९५ अ‍ॅटिव्ह रुग्णांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. दरम्यान, रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी १७. ६६ दिवसांवर आला आहे. काही दिवसांपूर्वी रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा दर हा २१ दिवसांपर्यंतचा होता.